बीड-जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला असुन आष्टी तालुक्यातील काही महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे आज सकाळपासून बीड जिल्ह्यात पाहणी दौरा करत आहेत. आष्टी तालुक्यातील मराठवाडी या जिल्ह्याच्या टोकाच्या गावापासून दौऱ्याला सुरुवात झाली असून, नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास मुंडेंनी मराठवाडी गावकऱ्यांशी संवाद साधताना व्यक्त केला आहे.
हेही वाचा... आज ८३ कोरोना बाधित रुग्ण https://prajapatra.com/3033
आष्टी तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या मराठवाडी, शेडाळा, देऊळगावघाट, सावरगांव, गंगादेवी या गावाचा पाहणी करताना शेतातून पिके वाहुन गेलेल्या बाजरी, सोयाबीन आदी पिकांची शेतांवर जाऊन पाहणी केली. यावेळी आ. बाळासाहेब आजबे, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, उपविभागीय अधिकारी रमेश मुडलोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री जेजुरकर, माजी आ. साहेबराव दरेकर,तहसीलदार राजाभाऊ कदम, डॉ. शिवाजी राऊत, सतिश शिंदे, अण्णासाहेब चौधरी, शिवाजी डोके, महादेव डोके, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे, शिवाजी नाकाडे, राम खाडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री धंनजय मुंडे शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले की, आता नुकसानीचे पुर्वी प्रमाणे पंचनामे न करता महसुल, कृषी व विमा कंपनीचे असे तिनही अधिकारी यांनी संयुक्त पणे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करतील. त्यानुसार जास्तीत जास्त भरपाई महाविकास आघाडी सरकार कडुन मिळवुन देण्यासाठी मी व माझे सहकारी प्रयत्नशिल असल्याचे श्री. मुंडे यांनी सांगितले.यावेळी गंगादेवी येथील तुटलेला रस्ता, सावरगाव येथील छोट्या नदीच्या पुरामुळे झालेले नुकसान यांची देखील पाहणी करून ना. मुंडे यांनी गंगादेवी येथील गावकऱ्यांच्या मागणीनुसार रस्त्याच्या पुनर्बांधणी कामासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत.