Advertisement

अनिल देशमुख यांच्या वकिलाला सीबीआयकडून अटक

प्रजापत्र | Thursday, 02/09/2021
बातमी शेअर करा

 

 मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख   यांच्या सीबीआय (CBI) चौकशी प्रकरणात बुधवारी रात्री नाट्यमय घडामोडी घडल्या. यानंतर आज अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा   यांना सीबीआयने अटक केल्याचे सांगण्यात येत आहे.  
अनिल देशमुख यांच्याविरोधात सुरु असलेला तपास पोलीस उपनिरीक्षकाच्या माध्यमातून परिणाम करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली वकील आनंद डागा यांना अटक करण्यात आली आहे. पुढील चौकशीसाठी वकील आनंद डागा यांना ट्रान्झिट रिमांडवर दिल्लीला नेण्यात येणार आहे.अनिल देशमुख यांच्याविरुद्धचा कथित प्राथमिक चौकशी अहवाल फोडल्याप्रकरणी सीबीआयने बुधवारी रात्री उशिरा उपनिरीक्षक अभिषेक तिवारी याला अटक केली. तर वकील आनंद डागा आणि इतर काही अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

 

दरम्यान, याच प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांनाही काल संध्याकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले आणि चौकशी करून अवघ्या २० मिनिटांत त्यांची सुटका करण्यात आली. तर अनिल देशमुख यांचे वकील ॲड. आनंद डागा यांचा मात्र रात्री उशिरापर्यत जबाब नोंदवला. त्यानंतर वकील आनंद डागा यांना सीबीआयने अटक केल्याचे समजते.याप्रकरणी अलाहाबाद व दिल्लीत काहींचा शोध घेण्यात येत आहे. शनिवारी सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेल्या या प्रकरणात बेकायदेशीर अहवाल फोडणे व त्यामध्ये फेरफार करण्यात सीबीआयमध्ये कार्यरत असलेला पीएसआय तिवारी मुख्य सूत्रधार होता. तसेच वकील व काही जणांचा यात सहभाग असल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले.

Advertisement

Advertisement