गेवराई- लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने १६ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेत सातत्याने अत्याचार केला. यानंतर तिचा गर्भपात केला. तसेच आमचे लग्न लावून द्या म्हणत पिडीत मुलीच्या आईचाही विनयभंग केल्याची संतापजनक घटना ठाकर आडगाव येथे घडली आहे. या प्रकरणी तलवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी आकाश सोनवणे फरार आहे.
ठाकर आडगाव येथे ३५ वर्षीय ऊसतोड कामगार महिला दोन मुले व एका १६ वर्षीय मुलीसह राहते. आकाश सोनवणे या तरुणाने वर्षभरापूर्वी लग्नाचे आमिष देऊन १६ वर्षीय मुलीला पळवून नेले. यानंतर तिच्यावर सातत्याने अत्याचार केला. दरम्यान, गर्भवती राहिल्याने मुलीचा गर्भपात केला. यानंतर गावी येत आमचे लग्न लावून द्या असे म्हणत आकाशने पिडीत मुलीच्या आईचाही दोन वेळा विनयभंग केला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पिडीतेने तलवाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. तलवाडा पोलिसांनी आकाश सोनवणे याच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार, विनयभंग या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पिंक मोबाईल पथक प्रमुख उपनिरीक्षक अर्चना भोसले या करत असून आरोपी फरार आहे.