Advertisement

अजित पवारांची मोठी घोषणा

प्रजापत्र | Monday, 26/07/2021
बातमी शेअर करा

 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांची संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सांगलीतील पलूस तालुक्यातील भिलवडी येथील पूर परिस्थितीची पाहणी करताना महिलांनी अजित पवारांकडे पुनर्वसन करण्याची मागणी केली. त्यावर अजित पवारांनी त्या महिलांना पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार आणि खासदार एक महिन्याचं वेतन पूरग्रस्त भागासाठी देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. 

 

 

अजित पवार यांच्यासमवेत पाहणीदरम्यान जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम उपस्थित होते. पूरग्रस्त गावात अद्यापही पिण्याच्या पाण्याची समस्या असल्याच्या प्रश्नावर अजित पवार यांनी उत्तर दिलं. मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या असून मुख्य सचिव परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. काही भागात बंद बॉटलने पाणी तर काही भागांत टँकरचा पुरवठा करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

 

राज्यातील नऊ जिल्ह्यात हे भीषण संकट ओढवलं आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार मदतीसाठी प्रयत्नशील आहे, बेघर झालेल्यांच्या पुनर्वसनाचाही आराखडा करण्यात येत आहे. नैसर्गिक संकटात महाराष्ट्रातील जनता मनापासून पुढाकार घेत, शक्य ती मदत करत असते. त्यामुळेच, माझंही जनतेला आवाहन आहे की, आपणही ज्यांना शक्य आहे, ज्यांची ऐपत आहे त्यांनी फूल नाही फुलाची पाखळी म्हणून पूरग्रस्त भागात मदत पाठवावी. 

Advertisement

Advertisement