Advertisement

 चेंबूरमध्ये भिंत कोसळून १७ जणांचा मृत्यू 

प्रजापत्र | Sunday, 18/07/2021
बातमी शेअर करा

 

 

मुंबई : मुंबईतील मुसळधार पावसामुळे चेंबूरमधील वाशीनाका परिसरात घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच ही दुर्घटना नेमकी कशी घडली याचा आढावा घेतला.मुंबईतील चेंबूरच्या वाशीनाका परिसरातील भारत नगर बी ए आर सी संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत तब्बल १७ जणांना जीव गमवावा लागला. या दुर्घटनेनंतर आदित्य ठाकरेंनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी एनडीआरएफचे जवान, अग्निशमन दलाचे जवान तसेच इतर स्थानिकांशी संवाद साधला. तसेच ही दुर्घटना कशी घडली याचीही माहितीही घेतली.

 

नेमक काय घडलं? 

मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईच्या सर्व उपनगरात पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. मुंबईतील मुसळधार पावसामुळ चेंबूरच्या वाशीनाका परिसरातील भारत नगर बी ए आर सी संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. या भिंतीलगत असणाऱ्या काही झोपड्यांवर ही भिंत कोसळली. तर दुसरीकडे  एकूण तीन घरांवर झाड आणि संरक्षक भिंत पडून घरांचे नुकसान झाले आहे. यात अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.आज सकाळी सातच्या सुमारास दुर्घटना घडली आहे.  यात १७ जणांचा मृत्यू झाला आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे. सध्या घटनास्थळी एनडीआरफचे पथक दाखल झाले आहे. तसेच मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून बचावकार्य सुरु आहे.

 

 

 

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

या दुर्घटनेत अद्याप ६ ते ८ जण अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सध्या या ठिकाणी वेगाने बचावकार्य सुरु आहे. मात्र ही दुर्घटना नेमकी कशी घडली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
 

Advertisement

Advertisement