Advertisement

कुटुंबातील संपलेला संवाद आणि समाज माध्यमांमधून मिळणारे अर्धवट ज्ञानाचा अडनिड्या वयाला धोका

प्रजापत्र | Sunday, 18/07/2021
बातमी शेअर करा

 बीडः बीडपासून जवळ असलेल्या एका गावात दोन अल्पयीन बालकांचे आपल्या चुलत बहिणीसोबत शरीर संबंध आल्याची घटना घडली. यापूर्वी देखील बीड तालुक्यातील एका गावात खेळाखेळात एका अल्पवयीन बालिकेसोबत तिच्याच अल्पवयीन मित्रांचे शरीर संबंध आल्याचा प्रकार घडला होता. त्या प्रकरणातही पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. या दोन्ही घटना तशा ताज्या आहेत मात्र यामुळे एकंदरच सामाजिक आरोग्यावर मोठे प्रश्‍नचिन्ह लागत आहेत. दोन्ही प्रकरणात आपण काय करत आहोत याचा पिडीत आणि बालकांना देखील पुरेसा अंदाज नव्हता असेच प्रथमदर्शनी समोर येत आहे. कुटूंबामधील सदस्यांचा संपत चाललेला संवाद आणि मग अडनिड्या वयात समाज माध्यमांमधून मिळणारे अर्धवट ज्ञान यामुळे अडनिड्या वयातील बालकांचा धोक्याच्या वळणावर अपघात होत असल्याची परिस्थिती आहे.

 

एकत्र कुटूंब पद्धती हा आता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात देखील इतिहास होवू लागला आहे. कुटूंबातील सदस्यांची मर्यादीत असलेली संख्या आणि त्यातही बालकांसोबत कोणत्या गोष्टी बोलाव्यात आणि कोणत्या नाही याबाबत अजूनही असलेले आडपडदे एका वेगळ्या संकटाला निमंत्रण देवू पाहत आहेत. मागच्या काही वर्षात बालकांवरील लैंगिक अत्याचाराचे प्रमाण जसे वाढले आहे तसे बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात अल्पवयीन बालकांचा आरोपी होत असल्याचा समावेश देखील वाढला आहे आणि हीच समाजासाठी चिंतेची बाब आहे.
सध्या बालकांना मोबाईल सर्रास उपलब्ध आहेत आणि मोबाईलच्या स्क्रिनवर समाज माध्यमांवरून मिळत असलेली वेगवेगळी माहिती देखील त्यांच्यातील कुतूहल वाढवत जाते. वयाच्या 12-15 वर्षातच अकाली मिळालेल्या अर्धवट ज्ञानातून लैंगिक गोष्टीबद्दलचे वाढत जाणारे आकर्षण मात्र त्याचवेळी या सार्‍या बाबी कोणाशी बोलता येत नसल्याने परिणामांची नसलेली जाणीव एकंदरच व्यवस्थेला एका घातक वळणावर नेवून पोहचवत आहे.

 

 

वर उल्लेख केलेल्या दोन्ही घटनांमध्ये आपण नेमके काय करत आहोत हे ना पिडीतेला कळले ना यातील आरोपींना असेच प्रथमदर्शनी दिसत आहे. ही केवळ प्रतिकात्मक उदाहरणे आहेत. अनेक ठिकाणी या गोष्टींचा परिणाम काय होतो याचीही माहिती नसते आणि केवळ आकर्षणातून, समाज माध्यमांमधून, कुठल्यातरी टिव्हीवरच्या दृश्यातून निर्माण होणारे आकर्षण आणि मग ‘ते’ करून पाहण्याची ओढ यातून असे प्रकार घडत असून नंतर मात्र यातील प्रत्येकाच्याच आयुष्यावर गंभीर आघात होत आहेत. या प्रश्‍नाकडे संपूर्ण समाजानेच निकोप आरोग्यदायी दृष्टीने पाहण्याची आवश्यकता आहे.

 

Advertisement

Advertisement