Advertisement

 मोदींकडून पुन्हा मुंडेंची उपेक्षा

प्रजापत्र | Thursday, 08/07/2021
बातमी शेअर करा

 

 बीड-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार अखेर पार पडला. या विस्तारात बीडच्या खासदार तथा दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या डॉ. प्रितम मुंडे यांना स्थान मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. राज्यभरातील मुंडे समर्थकांना भाजप आपल्या नेत्याला न्याय देईल असे वाटत होते,मात्र मोदींच्या भाजपने गोपीनाथ मुंडेंच्या वारसदारा ऐवजी संघाळलेल्या डॉ.भागवत कराडांना अधिक महत्व दिले आहे. मुळात गोपीनाथ मुंडेंचे वर्चस्व नरेंद्र मोदींना कधीच मान्य नव्हते. मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळात गोपीनाथ मुंडेंचा समावेश सर्वात शेवटच्या टप्प्यात उशीरा अगदी नाईलाज म्हणूनच झाला होता असं राजकीय निरीक्षकांचे त्यावेळी मत होते.त्यानंतर मोदींनी मुंडेंच्या वारसदारांची उपेक्षा करण्याची एकही संधी सोडली नव्हती. आता पुन्हा एकदा प्रितम मुंडेंच्या ऐवजी भागवत कराड यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन मोदींनी मुंडेंची उपेक्षा केली असून एकप्रकारे राज्यात भाजपचा ओबीसी चेहरा म्हणून देखील यापुढे कराडच असतील असाच संदेश दिला आहे.

 

         पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्ताराकडे सर्वांचे लक्ष होते. यात डॉ. प्रितम मुंडे यांना स्थान मिळण्याची अपेक्षा राज्यभरातील दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यकर्त्यांना होती. डॉ. प्रितम मुंडे या भाजपच्या खासदार म्हणून दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत,त्या उच्च शिक्षित आहेत,तसेच राज्यातील ओबीसी चेहरा आहेत, त्यामुळे  भाजप त्यांना न्याय देईल असे मुंडे समर्थकांना वाटत होते आणि त्यात कांही गैर देखील नव्हते. याउलट दुस-या विस्तारावेळी जे निकष सांगितले जात होते त्यात डाॅ.प्रितम मुंडे यांचे स्थान निश्चित वाटत होते.

 

मात्र सध्याचा भाजप मोदी-शहांचा भाजप आहे, आणि मोदींना गोपीनाथ मुंडे कधीच 'आपले'  वाटले नव्हते. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना देखील त्यांचे दिल्लीतील बस्तान प्रमोद महाजन यांनीच उठविले होते आणि मोदी केंद्रीय राजकारणात सक्रिय झाल्यानंतर देखील महाराष्ट्रात कोणी बाहेरचे प्रभारी नियुक्त करायला त्यावेळच्या सर्वशक्तिमान मोदींना बहुजन चेहरा असलेल्या गोपीनाथ मुंडेंनीच विरोध केला होता.त्यामुळे गोपीनाथ मुंडे आणि मोदी यांचे संबंध सर्वांना माहित होते. अगदी मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळात गोपीनाथ मुंडेंचा समावेश देखील सहज झाला नव्हता. मुंडेंबद्दलची ती राजकीय कटुता मोदी अजूनही विसरले नसल्याचेच आता समोर आले आहे. मुळात भागवत कराड यांना राज्यसभेवर घेण्याचा निर्णय देखील पंकजा मुंडे यांना विश्वासात घेऊन झाला नव्ह्ता. त्याचवेळी भाजप 'मुंडेंना ' पर्याय शोधात असल्याची चर्चा झाली होती. पंकजा मुंडेंनी त्यावेळी आपली नाराजी खाजगीत व्यक्त देखील केली होती, मात्र 'मुंडेंच्या ' नाराजीला गिनायचे नाही असेच जणू मोदींच्या भाजपने ठरविले असावे, त्यामुळेच आता केंद्रीय मंत्रिमंडळात थेट भागवत कराड यांना स्थान देण्यात आले आहे. हा सारा प्रकार साहजिकच राज्यातील मोठी व्होट बँक असलेल्या समाजात नेतृत्वाचा लोलक मुंडेंकडून कराडांकडे देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. यापूर्वी देखील राज्यात फडणवीसांचे सरकार असताना पंकजा मुंडेंकडील महत्वाचे खाते त्या विदेशात असताना राम शिंदे या आणखी एका ओबीसी चेहऱ्याकडे देण्यात आले होते, तसेच ज्या ओबीसी मंत्रालयाची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीनाथ गडावर केली होती, ते खातेही पंकजांकडे नव्हे तर राम शिंदेंकडे देण्यात आले होते. त्यानंतर मुंडे समर्थक महादेव जानकर यांना पर्याय म्हणून गोपीचंद पडळकर यांना भाजपने बळ दिले आहे. आणि आता थेट गोपीनाथ मुंडेंच्या कन्येला डावलण्यात आले आहे.हे करताना बचावाचा भाग म्हणून दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे टपाल तिकीट काढून समजूत काढण्यात आली. मोदींच्या भाजपात मुंडेंना केवळ उपेक्षाच असणार आहे हाच यातील संदेश आहे.

 

कराड गडकरी नाहीत
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळात सुरुवातीला गोपीनाथ मुंडे यांचे नाव नव्हते, अगदी गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या समर्थकांना दिल्लीला येऊ नका असे संदेश देखील दिले होते. मात्र त्यावेळी नितीन गडकरी यांनी मोदींची भेट घेऊन 'मंत्रिमंडळात मुंडे नसतील तर महाराष्ट्रातून कोणताच मंत्री शपथ घेणार नाही ' असे सांगितले होते, आणि त्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ऐनवेळी गोपीनाथ मुंडेंचे नाव यादीत आले होते अशी चर्चा त्यावेळी झाली होती. मात्र आता डॉ. प्रितम मुंडेंसाठी असे काही सांगायला डॉ. भागवत कराड हे काही नितीन गडकरी नाहीत आणि  महाराष्ट्रात आत्ताच निवडणूक देखील नाही .

 

Advertisement

Advertisement