Advertisement

व्यक्तीला नव्हे तर व्यवस्थेला विरोध केला

प्रजापत्र | Tuesday, 11/08/2020
बातमी शेअर करा

अ‍ॅड.अजित देशमुख हे नाव घेतलं की भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन आणि प्रशासनातील गैरव्यवहार समोर येतात. मात्र त्याचवेळी अजित देशमुखांच्या मागे कोण आहे अशाही चर्चा सुरू असतात यावर अजित देशमुख कोणा एका व्यक्तीसाठी काम करत नाही तर समाजासाठीच काम करतो. आम्ही कधीच कोणाला व्यक्तीगत टारगेट करत नाही.आम्ही कधीच कोणा एका व्यक्तीला विरोध केला नाही तर व्यवस्थेला विरोध केला. या शब्दात अ‍ॅड.अजित देशमुख आपल्या भावना व्यक्त करतात.

 

व्हिडिओ मुलखात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकला क्लिक करा 
https://youtu.be/Tobrg_4x6ZY 

 

प्रश्‍न-25 वर्षातील कागदांच्या गठ्ठ्यामधून अनेक कायद्यांचा प्रवास झालाय अशी पोस्ट आपण केली होती. काय आहे हा प्रवास?
अ‍ॅड.अजित देशमुख-मागच्या 25 वर्षापासून मी अण्णा हजारे यांच्या चळवळीत काम करतोय. या 25 वर्षात जे विषय हातळले, जी निवेदने दिली त्याचा गठ्ठा या लॉकडाऊनच्या काळात पहायला मिळाला आणि त्यावेळी लक्षात आलं याच निवेदनांनी काही कायदे तयार केलेत म्हणून मी ती पोष्ट केली होती.

प्रश्‍न-हा जो आपला प्रवास आहे तो नेमका कधी सुरू झाला?
अ‍ॅड.अजित देशमुख-1996 ला.

प्रश्‍न-कसा?
अ‍ॅड.अजित देशमुख-बीडमध्ये अण्णा हजारे, अविनाश धर्माधिकारी, बाबा आढाव, ग.प.प्रधान, गोविंदभाई श्रॉफ हे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्याठिकाणी अण्णांचे विचार ऐकले. आणि मग 1997 पासून त्यांच्यासोबत काम सुरू केलं. नंतर जनआंदोलन सुरू झालं. त्याच्या स्थापनेपासून विश्‍वस्त म्हणून काम केलं. आणि हा प्रवास अजूनही सुरूच आहे.

प्रश्‍न-आपण अण्णा हजारेंच्या विचारांकडे आकर्षिलं जावं असं काय घडलं होतं. घरात काही चळवळीचा इतिहास होता का?
अ‍ॅड.अजित देशमुख-तशी कौटुंबिक पार्श्‍वभूमी चळवळीची होती असा नाही. वडिल पोलीस खात्यात वायरलेस ऑपरेटर होते. त्यामुळे माझं शिक्षण सुरूवातीला नागपूर आणि औरंगाबाद येथे झालं. मात्र पहिल्यापासून भ्रष्टाचाराच्या विरोधातली एक चीड मनात होती म्हणूनच एलएलबी पास झाल्यानंतर मला एलआयसीत नौकरी लागली होती. पण अवघ्या पंधरा दिवसात नौकरी सोडली होती. पण ती नौकरी सोडल्यामुळेच मी सामाजिक क्षेत्रात काम करू शकलो. त्याचं आज समाधान आहे.

प्रश्‍न-अण्णा हजारेसोबत आपला पहिला संवाद काय झाला?
अ‍ॅड.अजित देशमुख-त्यावेळी अण्णा हजारे आणि गो.रा.खैरनाथ हे राज्य पातळीवर भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करत होते, जनजागृती करत होते. त्याच दरम्यान माझी अण्णांची भेट झाली. मला सुरूवातीपासूनच भ्रष्टाचाराची चीड होती. पण नेमकं काम कसं करायचं हे माहित नव्हतं. ते मी अण्णांना सांगितलं. आणि अण्णांनी काम सुरू करायला मार्गदर्शन केलं. एक व्यासपीठ त्या माध्यमातून मिळालं.

प्रश्‍न-आपण पहिला प्रश्‍न कोणता हाती घेतला?
अ‍ॅड.अजित देशमुख- मी जेंव्हा काम सुरू केलं तेव्हा पहिला प्रश्‍न घेतला तो गैरहजर कर्मचार्‍यांचा. शासकीय कार्यालयात दांडी मारणारे कर्मचारी अनेक असायचे. लोक शासकीय कार्यालयात यायचे पण कर्मचारी नसल्यामुळे त्यांची कामे व्हायची नाहीत. हे लक्षात आल्यानंतर आम्ही गैरहजर कर्मचार्‍यांचे पंचनामे करणे सुरू केलं. सरकारी अधिकार्‍यांना यासाठी विश्‍वासात घेतलं. हा विषय अण्णांना बोलल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासोबत बैठक झाली. त्यांनी पथकाची स्थापना केली. पण पथकाकडूनही फारसं काम होत नव्हतं. हे समोर आल्यानंतर सुरूवातीला मुंबईत प्रायोगीक तत्वावर बायोमेट्रीक पध्दत सुरू झाली. आज ती राज्यभरात वापरली जात आहे. त्यानंतर बीड जिल्ह्यातील 354 बोगस स्वातंत्र्यसैनिकांचा विषय लावून धरला. त्यानंतर पुढे अनेक विषय समोर येत गेले.

प्रश्‍न-माहिती अधिकार आंदोलनात आपण काय केलं?
अ‍ॅड.अजित देशमुख-माहिताचा अधिकाराचा कायदा आल्यानंतर आमची एक बैठक झाली. यात हा कायदा अगोदर कार्यकर्त्यांना समजला पाहिजे. हा विषय समोर आला. त्यासाठी राज्यभर 200 प्रशिक्षण शिबीरं मी घेतली. यातून कायदा समजावून सांगितला. हे करत असताना आजही एक गोष्ट प्रकर्षाने समोर येत आहे. माहिती अधिकार कायद्यामुळे कार्यकर्ते ब्लॅकमेल करतात असे काही लोक म्हणतात. पण खर्‍या अर्थाने प्रशासनच कायद्याला ब्लॅकमेल करतंय. माहिती अधिकार कायदा माहिती द्यायला सांगतो आणि प्रशासन मात्र ती लपवण्याचा प्रयत्न करत असतं. प्रशासनाला झाकून ठेवण्याची इच्छा का होते. कारण प्रशासनच काळं आहे. त्यामुळंच माहिती टाळण्यावर प्रशासनाचा भर असतो. प्रशासनाला हा कायदाच नकोय.

प्रश्‍न-हे असं असलं तरी अजित देशमुखांनी जिल्हा बदनाम केला असंही बोललं जातं?
अ‍ॅड.अजित देशमुख-पुढारी म्हणतीलच कारण प्रत्येक पुढार्‍याला आपल्या जनआंदोलनाचा फटका बसला आहे. रेल्वे भूसंपादनाचा विषय आम्ही लावून धरला. त्यात कोण होतं? किती शेतकरी होते आणि किती पुढारी होते. मग बोगसगिरी कोण करत होतं. पीक विम्याचा विषय हाती घेतला. एका घरात सव्वा कोटी, दुसर्‍या घरात एक कोटी तिसर्‍या घरात पंच्याहत्तर लाख असं तीन घरात तीन कोटी रूपये आले मग परळी बदनाम होणारच ना? मग असे काही लोक माझ्याबद्दल अपप्रचार करतात पण असल्या लोकांमुळेच विकास खुंटला आहे. हे लोक पश्‍चिम महाराष्ट्राकडून विकासाचे चांगले मुद्दे घेत नाहीत. पण चांगल्या माणसाला बदनाम करतात.

प्रश्‍न-पीक विम्यात आपण जी भूमिका घेतली त्यामुळे जिल्ह्याचा पीक विमा घ्यायला कोणतीच कंपनी तयार होत नाही?
अ‍ॅड.अजित देशमुख-तसंही काही नाही. आम्ही काय केलं तर बोगसगिरी थांबविली. 78 कोटीचा पीक विमा परत करायला लावला. तो जेव्हा मुंबईहून दिल्लीला गेला त्यावेळी कंपनीलाही आश्‍चर्य वाटलं. केवळ दोन सर्कलमधून 78 कोटी रूपये परत येतात. ते यापूर्वी कधी घडलं नव्हतं आणि आता तर पीक विम्यासाठी आधारलिंक सक्तीची करण्यात आली आहे. हे बीडमुळेच राज्याला लागू झाले आहे.

प्रश्‍न-या सर्व प्रवासात अडचणी काय आल्या?
अ‍ॅड.अजित देशमुख-मोठी अडचण होती ती म्हणजे नौकरी सोडावी लागली. हे काम करताना मी कधी पावती पुस्तक छापलं नाही. कोणाकडून एक रूपयाची देणगी घेतली नाही. हे आंदोलन चालविण्यासाठी जो काही खर्च केला तो स्वत:च्या खिशातून केला.वकीलीच्या कमाईतून केला. यामुळे कौटुंबिक पातळीवर मात्र अनेक तडजोडी कराव्या लागल्या. कुटुंबाला कसरत करावी लागली.

प्रश्‍न-अ‍ॅड. अजित देशमुख जेंव्हा एखादं निवेदन देतात त्यावेळी यामागे कोण असेल अशीही चर्चा सुरू होते. खरंच अजित देशमुख कोणासाठी काम करतात?
अ‍ॅड.अजित देशमुख-अजित देशमुख फक्त समाजासाठी काम करतो. मी कधी कोणाची व्यक्ती म्हणून तक्रार करत नाही. व्यक्तीगत विषय असेल तरी त्याला सार्वजनिक रूप देतो. पीक विमा रोखला तो सर्वांचाच. रेल्वे भूसंपादनात कोणा एकाची तक्रार नाही केली. बोगस स्वातंत्र्यसैनिकाच्या प्रश्‍नावर सर्वांच्याच विरोधी लढलो. परळीचं फेरफाराचं प्रकरणही तसंच आहे. आजपर्यंत प्रत्येक गोष्टीत व्यापकताच पाहिली. कधी कोणत्या एका व्यक्तीच्या मागे लागलो नाही पण माझ्या विरोधात काही बोलायचं असेल त्यांना धक्का बसला ते सारे विरोधक एकत्र येतात.

प्रश्‍न-गांधीवादी विचार सांगणार्‍या अण्णा हजारेंचे कार्यकर्ते असलेले अजित देशमुख मात्र प्रशासनाला असं करा नाहीतर तसं करू असे इशारे देत असतात. हा हुकूमशाहीचा प्रकार नाही का?
अ‍ॅड.अजित देशमुख-नाही. आम्ही अगोदर प्रशासनाला त्यांच्या चुका दाखवतो. त्यात सुधारण करायला सांगतो. मात्र त्यात सुधारण होत नसतील तर मात्र आंदोलन करायची भूमिका घ्यावी लागते. याला हुकूमशाही म्हणता येणार नाही. आम्ही कधी व्यक्तीच्या विरोधात लढत नाही. अगदी जिल्हा बँकेच्या विषयात चुकीचे होत आहे हे आम्ही सांगत होतो. त्यावेळी तर महायुती होती पण सगळेच एकत्र येतात. म्हणून आंदोलनाची व्यापकता वाढवावी लागते.

प्रश्‍न-ही झगडण्याची प्रेरणा कोठून मिळते?
अ‍ॅड.अजित देशमुख-तो आमचा विचार आहे. आपल्यावर कोणी बोट दाखविणार नाही आणि उजळ माथ्याने जगता येईल हा विचार मी जपतो. चारित्र्य शुध्द ठेवण्याचा उद्देश असतो आणि विरोध व्यवस्थेला करायचा व्यक्तीला नाही या विचारातून प्रेरणा मिळत राहते.

प्रश्‍न-या कामात कधी निराशा आली का?
अ‍ॅड.अजित देशमुख-नाही. निराशा अशी कधी आली नाही पण स्वातंत्र्यसैनिकाच्या विषयात बराच वेळ लागला. न्यायालयात गेल्यामुळं हा विषय जास्त लांबला गेला. पीक विमा, रेल्वे भूसंपादन असे विषय मात्र प्रशासकीय विषयावरच सोडविले.

प्रश्‍न-आनंदाचा क्षण कोणता?
अ‍ॅड.अजित देशमुख-मी जेंव्हा राज्याच्या कोणत्याही भागात जातो त्यावेळी त्या ठिकाणी 25-30 कार्यकर्ते भेटतात आणि काय काय बदल झाले हे सांगतात. गाव पातळीवर कार्यकर्ते उभा करता आले आणि विकासकामे झाली याचा आनंद वाटतो.

प्रश्‍न-25 वर्ष मागे वळून पाहताना काय वाटते?
अ‍ॅड.अजित देशमुख-समाधान आणि आनंद.

प्रश्‍न-भ्रष्टाचार विरोधी आंदोलनामध्ये येवू पाहणार्‍या तरूणांना काय सांगाल?
अ‍ॅड.अजित देशमुख-हे आंदोलन खर्‍या अर्थाने तरूणांनीच हाती घेतलं पाहिजे, वाढविलं पाहिजे पण हे करताना कोणत्याही राजकीय पक्षात जावू नका हे आंदोलन हाती घ्यायचं आहे तर राजकारण विरहित आंदोलन उभारा. तुम्ही कोण्या एका पक्षात गेलात तर त्या पक्षासाठी तुम्ही आंदोलन करताय असा शिक्का बसेल. त्यामुळे राजकारण विरहित भावनेतून चारित्र्य शुध्द ठेवत आणि आपल्याला व्यक्तीला नव्हे तर व्यवस्थेला विरोध करायचा आहे या भावनेतून काम करा. 

Advertisement

Advertisement