समीर लव्हारे
बीड दि.17ः कोरोनाचे नाव घेतले की नातेवाईक देखील जवळ यायला तयार होत नाहीत. अशा परिस्थितीत पाटोदा तालुक्यातील विजयसिंह उर्फ बाळा बांगर हा तरुण कोरोनाग्रस्तांच्या मदतीला धावतोय. मागच्या आठवड्यात चार दिवसांपासून एका घरात अन्नपाण्यावाचून एकट्याच पडलेल्या आजीबाईंना बाळा बांगर आणि सहकार्यानी जेवू घालून रुग्णालयात पाठविले होते. बाळा बांगरच्या या कार्याचे ठिकठिकाणी कौतूक होत असतानाच आता राज ठाकरेंनी देखील या कामाबद्दल बाळा बांगरच्या पाठीवर थाप मारली आहे.
बीड जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर भायाळाचे सरपंच विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी स्वत:ला कोरोनाग्रस्तांच्या सेवेत झोकून दिले आहे. कोरोनाग्रस्तांना तपासणीसाठी आणि उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्याचे काम अहोरात्र करताना बाळा बांगर यांना सुद्धा कोरोनाची बाधा झाली. मात्र त्यातून बरे झाल्यानंतर पुन्हा त्यांचे सेवाकार्य अविरत सुरु आहे.
आता कोरोनाने ग्रामीण भागाला लक्ष केले आहे. ग्रामीण भागात लोक अजूनही उपचाराला जायला तयार नाहीत. तर अनेकांकडे लक्ष देणारेच कोणी नाही. अनेक कुटुंबांत केवळ वृध्द आजी-आजोबा गावात आहेत. नाळवंडी येथील अशाच एका कुटुंबातील सर्वच कोरोनाबाधित झाले आणि घरी एकट्या आजी उरल्या. आजीलाही त्रास जाणवू लागला मात्र त्यांच्याकडे विचारपूस करायलाही कोणी फिरकले नव्हते. त्यामुळे दुखणे अंगावर काढत आजी घरातच चार दिवस झोपून राहिल्या. ना खाण्यापिण्याची सोय, ना उपचार यामुळे आजींची प्रकृती बिघडली होती. मात्र बाळा बांगर यांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने नाळवंडी येथे जाऊन त्या आजीला उचलून नेले नंतर जेवू घालत पुढील उपचारासाठी बीडला दाखल केले. आजीच्या मदतीला नाते नसलेला नातू धावून आला या शब्दात सोशल मीडियात बाळा बांगर यांच्या या कामाचे कौतूक होत आहे. या गोष्टीची दखल राज ठाकरे यांनी देखील घेतली असून राज ठाकरेंच्या वॉलवर बाळा बांगर यांना स्थान मिळाले आहे. धडपडणार्या कार्यकर्त्यासाठी ही थाप महत्वाची आहे.