गेवराई : पतीने दुसरे लग्न केले, पण तो ह्यात असेपर्यंत पहिल्या पत्नीला दुसरे लग्न करता येत नसल्याने तिने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचे समोर येत आहे. राजापार शिवारात सापडलेल्या मृतदेहाच्या प्रकरणात पोलीस तपासात ही गोष्ट समोर येत असून पोलिसांनी मयताच्या पत्नीसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाण्याअंतर्गत राजापुर शिवारात एका ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह दि.१ मे रोजी आढळला होता.परंतू मयताच्या तोंडावर माराच्या व गळ्यावर आवळल्याच्या खुना असल्याने हा घातपाताचा प्रकार असल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते.या प्रकरणात पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे हलविल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली.
गोळेगांव ता.गेवराई येथे भटक्या गोसावी समाजाची काही कुटुंब पाल ठोकुन वास्तव्यास आहेत. त्यातीलच ज्ञानेश्वर तुकाराम चव्हाण (वय ३५ वर्षे ) याचा मृतदेह राजापुर शिवारातील एका शेतात आढळुन आला होता.त्याचा तपास सपोनि प्रताप नवघरे यांनी केला. यात मयत तरुणाचे पहिले लग्न झालेले असताना त्याने दुसरे लग्न केले होते. गोसावी समाजातील प्रथेनुसार पहिला पती ह्यात असताना महिलेला दुसरे लग्न करता येत नाही, म्हणून मयताची पहिली पत्नी अस्वस्थ होती. तिचे अन्य एका इसमाशी प्रेम संबंध जुळले होते, मात्र पहिला पती हा या लग्नातला अडथळा ठरत होता. म्हणून तिने आपल्या प्रियकराच्या मद्तीने पतीचा काटा काढल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तलवाडा पोलीसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासांत या खुनाच्या प्रकरणाचा उडगडा केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी नाना अप्पा शिंदे वय १९ रा गोळेगाव व एक महिला यांना ताब्यात घेतले आहे.