पुनरुत्पादन दर ( आर व्हॅल्यू ) कमी व्हायला सुरुवात
बीड : देशभरात कोरोनाची दहशत निर्माण झालेली असतानाच आता महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी आहे. कोरोनाचा प्रसार होण्यासाठी जो पुनरुत्पादन दर ( आर व्हॅल्यू ) महत्वाचा मानला जातो तो महाराष्ट्रात घटायला सुरुवात झाली असून आता कोरोनाचा आलेख खाली यायला सुरुवात होईल असे अपेक्षित आहे. सध्या आर व्हाल्यू कमी असणारे देशातील पहिले राज्य छत्तीसगड असून त्या खालोखाल महाराष्ट्राचा क्रमांक लागला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुढील आठवड्यापासून कोरोना उतरणीला लागेल असे अपेक्षित आहे .
महाराष्ट्रात सध्या कोरोनाची रुग्ण संख्या स्थिर आहे. मात्र पुढील आठवड्यापासून ती कमी व्हायला सुरुवात होईल अशी अपेक्षा निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्गाचा वेग हा आर व्हॅल्यूवर अवलंबून असतो. आर व्हॅल्यू म्हणजे कोरोनाचा एक बाधित रुग्ण आणखी किती रुग्णांना बाधित करू शकतो याचा दर. ही आर व्हॅल्यू १ पेक्षा कमी झाली की मग लाट ओसरायला लागली असे समजले जाते . मागील आठवड्याच्या तुलनेत आता महाराष्ट्रात देखील आर व्हॅल्यू चा आलेख खाली यायला सुरुवात झाली आहे. सध्या महाराष्ट्राची आर व्हॅल्यू १. १३ इतकी आहे. ती एकदा का १ च्या खाली आली की मग रुग्णसंख्या देखील कमी होऊ लागेल. मात्र त्यासाठी आणखी किमान १ आठवड्याची प्रतीक्षा करावी लागेल असे अपेक्षित आहे.
सध्या देशात छत्तीसगड या एकमेव राज्याची आर व्हॅल्यू १ पेक्षा कमी (०. ९३ ) इतकी आहे तर सर्वाधिक उत्तर प्रदेशात १. ८४ इतकी आहे. देशाची सरासरी आर व्हॅल्यू आज १. ३१ इतकी आहे. म्हणजे महाराष्ट्राची सरासरी आता देशाच्या बरीच खाली आली आहे.
-----
मुंबई , पुण्यात लक्षणीय घट
मागील दोन तीन दिवसात मुंबई , ठाणे परिसरात कोरोनाचे आकडे कमी होऊ लागले आहेत. कारण मुंबईची आर व्हॅल्यू आता ०. ९४ इतकी झाली आहे. तर पुण्यात मागील आठवड्याच्या १. २४ च्या तुलनेत सोमवारी १. १३ इतकी आर व्हॅल्यू नोंदविली गेली आहे.
----
बातमी शेअर करा