राज्याचे माजी पर्यावरण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, वरोरा-भद्रावती विधानसभेचे माजी आमदार संजय देवतळे यांचे आज नागपुरात करोनावरील उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ यांच्यासह मोठा परिवार आहे. मृदू स्वभावाचे राजकारणी अशी संजय देवतळे यांची ओळख होती. अभियांत्रिकी चे शिक्षण घेतलेले देवतळे यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून सक्रिय राजकारणाला सुरुवात केली होती.
माजी मंत्री तथा त्यांचे काका दादासाहेब देवतळे यांच्या अकाली निधनानंतर माजी केंद्रीय अर्थ मंत्री व काँग्रेसचे तेव्हाचे खासदार शांताराम पोटदुखे यांच्या नेतृत्वाखाली त्यांना वरोरा-भद्रावती विधानसभेची उमेदवारी मिळाली. विधानसभेचे माजी उपाध्यक्ष ऍड. मोरेश्वर टेमुडे यांचा पराभव करून विजयी झाले होते. सलग २० वर्ष त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. २०१४मध्ये लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला. तिथून त्यांच्या राजकारणाला उतरती कळा लागली.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर भाजपाने त्यांना उमेदवारी दिली. तेव्हा शिवसेनेत असलेले काँग्रेसचे विद्यमान खासदार बाळू धानोरकर यांनी २ हजार मतांनी त्यांचा पराभव केला होता. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश घेतला होता. दरम्यान, त्यांना करोनाची लागण झाली होती. काही दिवसांपासून ते नागपूर येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते.
शांत, सुस्वभावी, सुसंस्कृत नेता हरपला -आ. सुधीर मुनगंटीवार
‘राज्याचे माजी मंत्री संजय देवतळे यांच्या निधनाने शांत, सुस्वभावी, सुसंस्कृत नेता हरपल्याची शोकभावना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. संजय देवतळे यांच्या निधनाची बातमी धक्कादायक असून, या बातमीवर विश्वासच बसत नाही. विधानसभा सदस्य म्हणून त्यांनी दीर्घकाळ जनतेची सेवा केली आहे. अतिशय शांतपणे, संयमितपणे जनतेचे प्रश्न विधानसभेत मांडणारा अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. पर्यावरण व सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी बजावली. त्यांच्या निधनाने चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो,’ असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. माजी खासदार नरेश पुगलिया, पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, माजी मंत्री हंसराज अहिर, आमदार सुभाष धोटे यांनीही शोक व्यक्त केला आहे.