Advertisement

अनिल देशमुख यांच्यासह इतरांविरुद्ध सीबीआयने दाखल केला गुन्हा

प्रजापत्र | Saturday, 24/04/2021
बातमी शेअर करा

मुंबई- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे गृहमंत्री पायउतार व्हाव्या लागलेल्या अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सिंह यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी देशमुख यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, विविध ठिकाणांची झाडाझडती घेण्यास सीबीआयने सुरुवात केली आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकं प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणावरून बराच गदारोळ सुरू झाल्यानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून तत्कालीन आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली होती. सिंह यांच्याकडून तपास चुका झाल्याचं विधान अनिल देशमुख यांनी केल्यानंतर सिंह यांनी लेटरबॉम्ब टाकला आहे.

सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र पाठवलं होतं. ज्यात अनिल देशमुख यांनी १०० कोटी वसूलीचं टार्गेट दिलेलं होतं, असा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी परमबीर सिंह यांनी आधी सर्वोच्च न्यायालय आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सीबीआयने प्रकरणाचा तपास सुरू केला होता.

 

परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपाप्रकरणी सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह या प्रकरणातील संबंधित इतरांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. आहे. तसंच प्रकरणाच्या तपासाच्या अनुषंगाने काही ठिकाणी सीबीआयकडून झाडाझडतीही सुरू करण्यात आली आहे.

 

वाझेंनीही केला आहे आरोप

वाझे यांनी स्वतःच्या हस्तक्षरात एनआयएला पत्र दिलेलं आहे. “२०२० मध्ये मला पोलीस दलात घेण्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध होता. माझी नियुक्ती रद्द करण्यात यावी, अशी शरद पवारांची इच्छा होती. मात्र, आपण शरद पवारांचं मतपरिवर्तन करू. त्याचबरोबर गुन्हेगारी गुप्तवार्ता शाखेत नियुक्ती करू, असं तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मला नागपूरमधून फोनवर सांगितलं होतं. या कामासाठी देशमुख यांनी मला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती,” असा दावा वाझे यांनी पत्रात केलेला आहे.

Advertisement

Advertisement