Advertisement

 चक्कर येऊन पडल्यानं  आठ जणांचा मृत्यू

प्रजापत्र | Friday, 16/04/2021
बातमी शेअर करा

नाशिक-  शहरात गेल्या काही दिवसांत चक्कर येऊन पडल्याने आठ ते नऊ जणांच्या नोंदी पोलीस ठाण्यात झाल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. अर्थात, अशा प्रकारे मृत्यू होण्याची नेमकी कारणे काय आणि कोणत्या डॉक्टरांनी त्यांना तपासले याबाबत कोणत्याही तपशील उपलब्ध नसल्याचे स्पष्टीकरण महापालिकेच्या वतीनं देण्यात आले आहे.

 

 

शहरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यातच गेल्या तीन-चार दिवसांपासून शहरात चक्कर येऊन मृत्यू होण्याचे प्रमाण वाढल्याचे सांगितले जात आहे. तशा आकस्मिक मृत्यूच्या नोंदी पोलीस ठाण्यात होत असल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. या चक्कर प्रकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रदेखील चक्रावून गेले आहे. हे मृत्यू कोरोनाचे लक्षण समजावे किंवा नाही याबाबतही वैद्यकीय क्षेत्रात मतभिन्नता आहे. मात्र चक्कर येणे, डोळ्यासमोर अंधारी येणे व तत्सम काही लक्षणे असल्यास तत्काळ आपल्या फॅमिली डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

 

 

यासंदर्भात महापालिकेच्या कोविड सेलचे प्रमुख डॉ. पलोड यांच्याशी संपर्क साधला असता चक्कर आल्यामुळे मृत्यू झाल्याचे प्रकरण महापालिकेने नोंदवले गेलेले नाही. कोणा व्यक्तीचा मृत्यू झाला असल्यास संबंधित डॉक्टरांनी त्याच्या मृत्यूचे प्रमाणपत्र काहीतरी दिले असेल त्यातून त्याचा उलगडा होऊ शकतो असे स्पष्ट केले. कोरोनामुळे मृत्यू झाले असल्याचा इन्कार करत चक्कर येणे आणि मळमळणे हे अनेक आजारांचे लक्षण असू शकते. त्यामुळे त्याच्या तपशिलात जाऊन बघावे लागेल. संबंधित मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांकडे असलेल्या मृत्यूच्या प्रमाणपत्रात ते स्पष्ट होऊ शकते असे त्यांनी सांगितले. मात्र तरीही चक्कर येणे किंवा तत्सम कोणत्याही आजाराबाबत गाफिल राहू नये असे आवाहनही डॉ. पलोड यांनी केले आहे

Advertisement

Advertisement