Advertisement

"महाविकास आघाडीचं सरकार बदलणारा अजून जन्माला यायचा आहे !'

प्रजापत्र | Thursday, 15/04/2021
बातमी शेअर करा

 पंढरपूर (सोलापूर) : महाराष्ट्रातील जनतेच्या विश्वासावर राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार बनवलं आहे. असं हे भरभक्कम संख्याबळ असलेलं सरकार बदलणारा अजून जन्माला यायचा आहे, असा पलटवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूर येथे बुधवारी जाहीर सभेत बोलताना केला.

 

 

दोन दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत "तुम्ही भाजपचा एक उमेदवार निवडून द्या, मी सरकार बदलवून दाखवतो', असा सूचक इशारा महाविकास आघाडीला दिला होता. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्‍तव्याचा चांगलाच समाचार घेतला. सरकार बदलायला हा काय पोरखेळ वाटला का? असा टोलाही त्यांनी भाजप नेत्यांना लगावला.

 

 

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.  

उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची विचारधारा वेगवेगळी असली, तरी सर्वसामान्य लोकांचा विकास व्हावा यासाठी हे सरकार स्थापन झालं आहे. महाविकास आघाडीला 170 आमदारांचा पाठिंबा आहे. तर विरोधकांकडे जेमतेम 115 आमदार आहेत. आणखी त्यांना 30 आमदार कमी पडत असताना ते सरकार बदलायची भाषा बोलतात. त्यांना हा काय पोरखेळ वाटला का? केवळ निवडणुकीत गाजर दाखवण्याचं त्यांचं काम सुरू आहे. सरकार बदलणारा अजून जन्माला यायचा आहे, असे म्हणत विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले.

 

 

मागील पाच वर्षांत भाजप- शिवसेनेच्या काळात पश्‍चिम महाराष्ट्रावर मोठा अन्याय झाला. या भागातील अनेक योजनांना जाणूनबुजून निधी दिला नाही. मंगळवेढा तालुक्‍यातील उपसा सिंचना योजनेला देखील निधी दिली नाही. आता पुन्हा आमचं सरकार आलं तर आम्ही निधी देऊ असं सांगत आहेत; मग मागील पाच वर्षांत तुमचा कोणी हात धरला होता का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

 

 

विरोधी पक्षाकडून अजूनही राजकारण केलं जात आहे. मागील पाच वर्षात त्यांनी पक्षात येणाऱ्या लोकांचीच कामं केली. भाजपात कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही. त्यामुळे अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीत येऊ लागले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकेल पण देवेंद्र फडणवीस हे पाच वर्षे तरी विरोधी पक्षनेतेपदी राहतील की नाही याविषयी आता शंका निर्माण झाल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

 
 

Advertisement

Advertisement