उस्मानाबाद दि.15 - महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाचं आणखी एक धक्कादायक चित्र समोर आलं आहे. स्मशानभूमीमध्ये जागा अपुरी पडत असल्याचं याआधी अनेक शहरांमधून समोर आलं होतं. मात्र महाराष्ट्रातील उस्मानाबादमध्ये काही अंत्यसंस्कार पुढे ढकलण्यात आलं आहे. महाराष्ट्रात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची परिस्थिती दाखवणारं हे अत्यंत दाहक चित्र आहे.
उस्मानाबाद शहराच्या जवळ असलेल्या स्मशानभूमीत आज १९ मृतदेहांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. जागा अपुरी पडल्याने ८ मृतदेहांचे अंत्यसंस्कार उद्यावर ढकलण्यात आले आहेत. उस्मानाबादच्या स्मशानभूमीत जे १९ अंत्यसंस्कार झाले तेही अत्यंत दाटीवाटीने करण्यात आले, एक एक फूट जागा ठेवून सरण रचण्यात आले होते.
महाराष्ट्रात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण चिंताजनक आहे. उस्मानाबादसारखं चित्र याआधी महाराष्ट्रातील इतरही ठिकाणी पहाण्यात आलं आहे. स्मशानभूमीत जागा सोडा आता सरणासाठी लाकडं मिळणंही कठीण झाल्याची माहिती आहे, त्यामुळे कमी लाकडांमध्ये सरण पेटवावं लागत आहे.