कोल्हापूर: वरिष्ठांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून पोलीस निरीक्षकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. झोपेच्या गोळ्या खाल्ल्यानंतर या अधिकाऱ्याने वारणा नदीत उडी मारली. या घटनेने कोल्हापूर पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
प्रदीप काळे असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी त्यांनी व्हॉट्सअँपवर मजकूर पोस्ट केला. वरिष्ठांकडून होणारा छळ सहन होत नसल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे त्यात नमूद केले. त्यांनी झोपेच्या गोळ्या खाल्ल्यानंतर वारणा नदीत उडी घेतली. काळे यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने कोल्हापूर पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान, फेब्रुवारीत नवी मुंबईत एपीएमसी पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक भूषण पवार यांनीही स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. डिसेंबर २०२०मध्ये अशाच प्रकारची एक घटना तुळींज पोलीस ठाण्यात घडली होती. तेथील कॉन्स्टेबलने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक प्रदीप काळे हे कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक म्हणून काम करत होते. तीन महिन्यांपूर्वी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. उजळाईवाडी विमानतळावर सुरक्षा अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यापासून ते मानसिक तणावात होते. आपण आत्महत्या करत असल्याचा मेसेज सकाळी त्यांनी अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअँप ग्रुपवर टाकला. अधिकार्यांनी तो मेसेज पाहताच त्यांची भंबेरी उडाली. तातडीने सर्वांनी त्यांचा शोध सुरू केला. पण, त्यांनी मोबाइल स्वीच ऑफ केल्याने शोध घेण्यात अडचण येऊ लागली.
पोलिसांनी काळे यांच्या मोबाइल लोकेशनची माहिती घेतल्यानंतर, ते वारणा नदीच्या काठावर असल्याचे लक्षात आले. त्यानुसार पोलिसांनी तिकडे धाव घेतली. त्यांनी वारणा नदीत उडी मारल्यानंतर तेथे असलेल्या काहींनी त्यांना वाचवले. मात्र, ते बेशुद्धावस्थेत होते. पोलिसांनी त्यांना प्रथम कसबा बावडा येथील सेवा दवाखान्यात दाखल केले. नंतर एका खासगी रुग्णालयात त्यांना हलविण्यात आले. त्यांनी झोपेच्या गोळ्यांचे अतिसेवन केल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे. या घटनेने पोलीस दल हादरले आहे. काळे अजूनही बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्यांचा जबाब घेता आला नाही. त्यामुळे पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे काळे यांनी व्हॉट्सअँपवर पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटले आहे.