Advertisement

संपूर्ण लॉकडाउनच्या घोषणेनंतर गावाला जाता येणार का?

प्रजापत्र | Tuesday, 13/04/2021
बातमी शेअर करा

मुंबई: लॉकडाउनची घोषणा झाल्यानंतर लोकांची गैरसोय होऊ नये. घरापासून लांब असलेल्यांना आपापल्या घराकडे परतता यावं म्हणून लॉकडाउनची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याआधी किमान दोन दिवसांचा वेळ दिला जाण्याची शक्यता आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज तसे संकेत दिले. 'लोकांना किमान वेळ दिला जावा असं सर्वांचंच मत आहे. मुख्यमंत्री ठाकरे हे त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतील,' असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.  

 

 

राज्यात संपूर्ण लॉकडाउनची तयारी जवळपास झाली आहे. लॉकडाउन नेमका कसा असेल? त्यात नेमके काय निर्बंध असतील? काय सवलती असतील? याबाबत मुख्यमंत्री ठाकरे आज किंवा उद्या घोषणा करतील, असं वडेट्टीवार म्हणाले. 'राज्यात एक आठवड्याचा लॉकडाउन पुरेसा नाही. किमान १४ दिवसांचा असावं असं सगळ्याचं मत आहे. अर्थात, अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. तो दोन आठवड्यांचा असावा किंवा कमी असावा किंवा जास्त असावा यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील,' असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं. 'तत्पूर्वी, कामगारांना किंवा घरापासून दूर असलेल्यांना सुरक्षित घरी पोहोचण्यासाठी वेळ दिला जाईल. लोकांना त्यांच्या त्यांच्या गावी जाऊ देण्याबाबतही सरकार सकारात्मक आहे,' असं ते म्हणाले.

 

 

लॉकडाउनला विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या भूमिकेचा वडेट्टीवार यांनी समाचार घेतला. 'व्यापाऱ्यांनी लोकांच्या जिवाशी खेळू नये. पंतप्रधान मोदी यांनी वर्षभरापूर्वी अचानक लॉकडाउन लावला. अजिबात सवड दिली नाही. त्यावेळी त्यांनी गपगुमान तो निर्णय मान्य केला. त्यावेळी ती गरज होती, तशी आजही आहे. त्यामुळं संकटाच्या या काळात राज्यातील व्यापाऱ्यांनी किंवा कोणीही राजकारण करू नये. घोषणा केल्यानंतरही व्यापाऱ्यांनी साथ नाही दिली तर त्यासाठी तेच जबाबदार असतील, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला. 'करोनाचा सध्याचा स्ट्रेन अतिशय घातक आहे. त्याचा संसर्गाचा वेग भयानक आहे. बाधित रुग्ण तीन चार दिवसांत अत्यवस्थ होत असल्याचं दिसून आलंय. अशा रुग्णांना वेळेवर उपचार दिले नाही तर त्यांचा मृत्यू ओढवतो. लॉकडाउन हा जगानं स्वीकारलेला उपाय आहे. प्रत्येकानं हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे,' असंही ते म्हणाले.

Advertisement

Advertisement