वसई- नालासोपारा येथील विनायका रुग्णालयात सोमवारी एकाच दिवशी सात करोनाबाधित रुग्ण दगावल्याची घटना घडली. या रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. या सर्व घटनेमुळे रुग्णालयाबाहेर सोमवारी रात्री मोठा गोंधळ उडाला होता.
रुग्णांच्या नातेवाईकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. तसेच मनसे कार्यकर्ते देखील या ठिकाणी जमा झाले होते. मात्र तुळींज पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत गर्दी पांगवली. या रुग्णालयात ऑक्सिजन दुपारी साडेतीन वाजता आल्याची खात्री केल्याचे तुळींज पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले. या ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांनी कोणत्याही प्रकारची तोडफोड केली नसून नातेवाईकांची रुग्णालयाविरोधात तक्रार असल्यास ती पुढे नोंदविण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी पुढे सांगितले.
पालिका हद्दीतील इतर तीन खासगी रुग्णालयांत मिळून चार रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी दोघांचा मृत्यू ऑक्सिजनअभावी झाल्याचे समोर आले आहे. वसई-विरार महापालिका हद्दीत ऑक्सिजनच्या तुटवड्यावर उपाय म्हणून पालिकेच्या रुग्णालयात पुरेसा साठा मागविण्यात आला आहे. मात्र खासगी रुग्णालयांतील ऑक्सिजन पुरवठ्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागाची असल्याचे पालिका उपयुक्त डॉ. किशोर गवस यांनी सांगितले.