Advertisement

बेड न मिळाल्यामुळं कोरोना रुग्णाचा सिव्हिल हॉस्पिटलच्या दारातच मृत्यू

प्रजापत्र | Monday, 12/04/2021
बातमी शेअर करा

अहमदनगर- ऑक्सिजन बदलण्यास उशीर झाल्याने दोन रुग्णांच्या मृत्यूचा प्रकार समोर आल्यानंतर नगरच्या जिल्हा रुग्णालयातील आणखी एक वेदनादयी प्रकार समोर आला आहे. श्रीरामपूरहून आलेल्या अत्यवस्थ रुग्णाला बेड न मिळाल्याने त्याचा दारातच मृत्यू झाला. मृतदेह दोन तास वाहनातच पडून होता. सरकारी आणि खासगी रुग्णालयांत खाटा उपलब्ध नसल्याने अनेक ठिकाणी रुग्णवाहिकेतच ठेवून ऑक्सिजन देण्याची वेळ आल्याचे चित्रही नगरमध्ये पहायला मिळत आहे.

 

श्रीरामपूर येथील एका रुग्णाची अशीच हृदयद्रावक अवस्था समोर आली आहे. रुग्ण गंभीर झाल्याने नगरच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. नातेवाईक खासगी वाहनातून रुग्णाला घेऊन आले. मात्र, त्यावेळी जिल्हा रुग्णालयात जागा नव्हती. त्यामुळे त्यांना इतरत्र जाण्याचा सल्ला देण्यात आले. नातेवाईकांनी शहरातील बहुतांश हॉस्पिटलमध्ये फिरून पाहणी केली. मात्र, कोठे बेड शिल्लक नव्हता. त्यामुळे रुग्णाला पुन्हा जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, तेथे आणत असतानाच रुग्णाचा मृत्यू झाला. याची माहिती नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला देऊन मृतदेह वाहनातून काढून आत घेण्याची विनंती केली. मात्र, यासाठीही तब्बल दोन तासांचा कालावधी लागला. तोपर्यंत मृतदेह वाहनातच असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयाचे प्रशासन मात्र, या घटनेवर काहीही बोलायला तयार नाही.

 

नगर शहरातील सर्व रुग्णालयांची क्षमत संपली आहे. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची गरज असलेल्या रुग्णांची संख्या वाढत असून ती व्यवस्था अपुरी आहे. शहरातील सर्व खासगी हॉस्पिटलमधील ८० टक्के बेड करोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचा आदेश महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांनी दिला आहे. त्यानुसार तीन हजार सातशे बेड उपलब्ध होणार असले तरी त्यातील आधीच बहुतांश बेड फुल आहेत. शिवाय त्यामध्ये ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या बेडची संख्याही अपुरी आहे.

 

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले की, जिल्ह्यात बेडची कमतरता आहे. यासाठी बेड आरक्षित करण्यात येत आहेत. याशिवाय ३१ नवी कोविड केअर सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आणखी बेड उपलब्ध होऊ शकतील. यंत्रणा उभारण्यावर प्रशासनाचा भर आहे.

 

Advertisement

Advertisement