ऊस्मानाबाद- वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मागील आठ दिवसापासून प्रशासनाच्या वतीने केशकर्तनालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र केशकर्तनालये बंद झाल्याने उदर्निवाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने तालुक्यातील सांजा येथील एका सलुन व्यावसायिकाने चिठ्ठी लिहून विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या ऊस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. ही वाढती रुग्णंसख्या अटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. या उपाययोजनांचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील सलून (केशर्कतनालये) बंद ठेवण्याचे आदेश देणात आले आहेत.
मात्र, मागील आठ दिवसापासून व्यवसाय बंद असल्याने उदनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने तालुक्यातील सांजा येथील तरुण सलुन व्यावसायिक मनोज झेंडे (४०) यांनी शनिवारी रात्री विषारी औषध प्यायले. घराच्या लोकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी ताबडतोप झेंडे यास जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आज सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर आज दुपारी त्यांच्यावर सांजा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मनोज झेंडे यांच्या पश्चात २ मुले व १ मुलगी पत्नी असा परिवार आहे.
मनोज झेंडे यांनी मृत्युपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असून यात लिहीले आहे की, मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येला कोणालाही दोषी ठरवू नये. मी माझ्या जीवाला कंटाळून आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येमुळे माझ्या घरच्यांना त्रास देऊ नये. तसेच माझ्या घरच्या लोकांवर बायको, भावावर कोणतेही आरोप घेऊ नये ही माझी कळकळीची विनंती आहे.
मी कोरोनाला आणि गरिबीला कंटाळून आत्महत्या करीत आहे. असं देखील म्हटलं आहे. आमची दुकाने बंद आहेत, आम्ही ५ हजार रुपयावर घर कसे चालवायचे अस देखील मनोज झेंडे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिट्ठीत लिहिले आहे.
सलुन दुकानावरच उदरर्निवाह
मनोज झेंडे यांचे सांजा गावात छोटे केशकर्तनालय होते. यावरच ते आपल्या कुटूंबाची उपजिवीका करत असत. त्यांना ना शेती होती ना इतर कोणतेही उत्पन्नाचे साधन. मागील आठ दिवसापासून धंदा बंद असल्याने पैसा येणे बंद झाले. यातच हातऊसने घेतलेले पैसे, कर्ज, लाईट बील यासह इतर देणी असल्याने त्यांनी मनोज झेंडे यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
शासनाने आम्हाला आत्मम्ह्त्या करण्याची परवानगी द्यावी – सचिन चौधरी
मनोज झेंडे यांच्या आत्महत्येनंतर नाव्ही समाजातील सामाजिक कार्यकर्ते सचिन चौधरी यांनी देखील आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे. गेल्या ८ दिवसांपासून केसकर्तनालयाचे दुकाने बंद करण्याचे आदेश काढले आहेत, त्यामुळे समाजावर उपासमारीची वेळ आलेली आहे, याचा पहिला बळी धाराशिव जिल्ह्यात गेला आहे.
एकतर शासनाने आम्हाला कुठलीही मदत केलेली नाही. आमचा उदरनिर्वाह फक्त केसकर्तनालयाच्या दुकानावर आहे. मुलांचे शिक्षण आणि घरभाडे आणि दुकानभाडे हे कुठून द्यायचे असा सवाल सचिन चौधरी यांनी उपस्थित केला आहे. एकतर शासनाने आम्हाला दुकाने उघडायची परवानगी द्यावी नाहीतर आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.