देशभरातील कोरोना रुग्णांपैकी सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात आढळत आहेत. दरम्यान कोरोनापासून बचाव करण्यासाठी देशभरासह राज्यभरात वेगाने लसीकरण सुरू आहे. आता देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र सातत्याने प्रथम क्रमांकावर आहे. आज राज्याने त्यात विक्रमी नोंद केली. आतापर्यंत सुमारे १ कोटीपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत १ कोटी ३८ हजार ४२१ जणांना लस देण्यात आली आहे. सायंकाळपर्यंत या आकडेवारीत अजून वाढ होणार असल्याची माहिती असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडून यंत्रणेचे कौतुक करण्यात आले आहे.
राज्यात कोरोना लसींचा तुटवडा
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना लसींचा तुटवडा असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली होती. यामुळे राज्यातील लसीकरण मोहीम मंद गतीने सुरू होते. अनेकांना लसीकरण केंद्रांवरुन लस नसल्यामुळे परत पाठवले जात होते. अनेक लसीकरण केंद्रेही बंद करण्यात आली. लसी देण्याच्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप करणे सुरू आहे.
देशात १०कोटींपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण
देशात आतापर्यंत कोरोनाच्या १० कोटीपेक्षा जास्त लसी देण्यात आल्या आहेत. दुसऱ्या देशांच्या तुलनेत भारताला एवढ्या लसी देण्यासाठी केवळ ८५ दिवस लागले. एवढ्या वेळेत अमेरिकेत ९. २ कोटी आणि चीनमध्ये ६. १४ कोटी डोस देण्यात आले होते. आरोग्य मंत्रालयाने याविषयी माहिती दिली आहे. मात्र एकूण व्हॅक्सीनेशनच्या हिशोबाने पाहिले तर अमेरिका आणि चीन भारतापेक्षा खूप पुढे आहेत.
भारताने पहिल्या टप्प्यामध्ये सर्व आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण १६ जानेवारीपासून सुरू केले होते. दुसरा टप्पा १ मार्चपासून सुरू झाला होता. यामध्ये ४५ पेक्षा जास्त वयाच्या आजारी लोकांना आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांना लस देण्यात आली. यानंतर २ एप्रिलपासून सुरू झालेल्या टप्प्यामध्ये ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्वच लोकांना लसी देण्यात आल्या.