मुंबई- राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांवर आळा घालण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन केला जाऊ शकतो. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या संदर्भात निर्णय घेण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. यात राज्यातील लॉकडाऊनवर निर्णय घेतला जाऊ शकतो. दरम्यान, यापूर्वीच राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरु झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील अशा अनेक नेत्यांची उपस्थिती आहे.
लॉकडाऊनवर एकमताने निर्णय घेऊ- उद्धव ठाकरे
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, 'कोरोना लसीचा दुसरा डोस देऊनही लोक पॉझिटिव्ह होत आहेत. हा मुद्दा पंतप्रधान मोदींसमोर मांडला होता. सध्या कोरोनाची साखळी तोडणं आणि आरोग्य सुविधा वाढवणं गरजेचं आहे. लॉकडाऊनबाबत निर्णय घ्यायचा झाल्यास तो एकमताने घेतला गेला पाहिजे. कालच निर्णय झाला असता पण देवेंद्रजी आपण नव्हता म्हणून आजची ही बैठक बोलावली आहे. लॉकडाऊन लावल्यास महिन्याभराच्या आत आपण परिस्थिती नियंत्रणात आणू शकतो. पण एकमत झाल्याशिवाय ते शक्य होणार नाही, असे मत मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडले.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोरोना रुग्ण वाढत आहेत, यासाठी निर्बंध असायला हवे. पण, कडक लॉकडाऊन केला तर जनतेचा उद्रेक होईल. आपण, जनतेचा उद्रेक लक्षात घेतला पाहिजे.
मध्यबिंदू काढा- अशोक चव्हाण
यावेळी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मध्यबिंदू काढण्याचा मार्ग सुचवला. ते म्हणाले की, आव्हानात्मक परिस्थिती आहे. लॉकडाऊन किंवा निर्बंध लावायचे असतील तर गरिबांचंही नुकसान होणार नाही अशी व्यवस्था करावी लागेल. पूर्ण लॉकडाऊनही नको आणि सर्व सुरु नको, मध्यबिंदू साध्य करायला हवा.