नाशिक- कोरोना काळात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी देवासारखे धावून येत आहेत. त्यातच लोकांच्या अडचणीचा गैरफायदा घेणारेही काही डॉक्टर आणि रुग्णालये आढळून आले आहेत. नाशिकच्या एका खासगी रुग्णालयाने पैसे भरले नाही म्हणून वृद्धाला डांबून ठेवले. हा धक्कादायक प्रकार पालिका प्रशासनाच्या लक्षात आल्यावर त्यांनी वृद्धाची सुटका केली.
कोरोना संसर्गाचा वाढणाऱ्या प्रादुर्भावामुळे अनेक रुग्ण दवाखान्यांच्या खेटा घालत आहेत. परंतु कोव्हिडचा त्रास जास्त जाणवू लागल्यास रुग्णालयात दाखल होण्याशिवाय पर्याय नसतो. परंतु रुग्णांच्या असह्यतेचा गैरफायदा काही रुग्णालये घेत आहेत.
नाशिकच्या workhard रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका वृद्धाला उपचारासाठी या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाने 5 लाख रुपये मेडिकल इन्शुरन्स संपवला त्यानंतर 50 हजार आगाऊ भरूनदेखील दीड लाख रुपये भरण्यास सांगितले. शेवटी 12 लाख रुपयांचे बील न दिल्याने वृद्धाला 3 दिवस डांबून ठेवण्यात आले.
पैसे भरण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांकडे रुग्णालयाने तगादा लावला. पैसे भरले नाही तर सूटका नाही. असा दम रुग्णालयाने दिला. रुग्णाने जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांच्याकडे संबधित रुग्णालयाची तक्रार केली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला . अखेर पालिका प्रशासनाने कारवाई करत वृद्धाची सुटका केली आहे. उल्हास केशव कोल्हे (रा, जळगाव) यांच्याबाबतीत हा प्रकार घडला आहे