Advertisement

मरणाने केली सुटका,निर्बंधांनी छळले होते,असे होऊ नये

प्रजापत्र | Thursday, 08/04/2021
बातमी शेअर करा

बीड दि.7 (प्रतिनिधी) - कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात कठोर निर्बंधांच्या नावाखाली बहुतांश व्यवसायांना सरकारने कुलूप लावले आहे. त्यामुळे ज्यांचे हातावर पोट आहे, तो मोठा वर्ग परेशान आहे. त्यातच पुण्यातील एका वडापाव विक्रेत्याचा ‘सरकारने आम्हाला विष आणून द्यावे’ अशी प्रतिक्रिया असलेला व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यातील राजकारण थोडं बाजुला ठेवलं तरी ही प्रतिक्रिया प्रातिनिधिक आहे. असेच चित्र राहिले तर लोक कोरोनातून वाचतील पण भूकेने मरतील किंवा मनोरुग्ण होतील. जनतेवर ‘मरणाने केली सुटका, निर्बंधांनी छळले होते’ असे म्हणण्याची वेळ सरकारने येऊ देऊ नये.

 

संतोष (नाव बदलले आहे), वय 30, एका चहाच्या गाडयावर काम करायचा, घरात आई वडील, बायको, 1 लेकरु, कमावणारा एकटाच, या निर्बंधात गाडाच चालेल का नाही माहित नाही, म्हणून मालकाने येऊ नको म्हणून सांगितलय, आता 5 तोंडांची भूक भागवायची कशी हा त्याचा प्रश्नय...
सोहेल, (नाव बदललेय), वयाची पन्नाशी गाठलिय, बंगाली सोने कारागिर म्हणून बीडमध्ये काम करतात, दागिने गाठून देणे, चकाकी करुन देणे यावर त्यांची उपजिविका, पण मागच्या काही दिवसात सोन्याची दुकानेच बंदयत, आता स्वतः काय खायच आणि घरी काय पाठवायच हा प्रश्न कायमय.
प्रकाश, वय 40, धंदा सलुनमधील कारागिर, निर्बंधांच नाव निघालं की अगोदर सलुन बंद. एकतर लोकांमध्ये भिती, आणि त्यात सारखं सारखं सलुनच बंद, खायच काय? घरच्यांना जगवायचं कसं?

 

संतोष, सोहेल, प्रकाश ही केवळ एकटी नावं नाहीत, हे प्रतिनिधी आहेत समाजाच्या शेवटच्या घटकांचे. बांधकाम कामगार, बिगारी कामगार, घरगुती उपकरण दुरुस्ती करणारे, फिरुन भांडी बासणं विकणार्‍या महिला, भंगार जमविणारे असे कितीतरी घटक आज पुन्हा बेकार झालेत आणि त्यांच्यापुढे रोजच्या जगण्याचा प्रश्नय...हा प्रश्न नुसत्या भुकेचा नाही, भूक तर आहेच पण घराचा किराया, घरातील आजारी माणसांच औषधपाणी अन असे अनेक प्रश्नयत...हे सुटले नाही तर एकतर वैफल्य वाढतय नाही तर जगण्याची इच्छा संपतेय, कोणी हे बोलुन दाखवतय, कोणी मनात कुढतय...पण हे आजचं सार्वत्रिक चित्र आहे आणि ते समाजाच्या मानसिक आरोग्यासाठी जास्त घातक होत चाललय. कोरोनातून वाचता येईल कदाचित, पण भूकेचं, वाढत्या कर्जाचं, लाचारीच्या जगण्याचं काय? हे प्रश्न सुटले नाहीत तर लोकांना खरच मरणं चांगलं वाटु लागेल अशी परिस्थिती आहे.
‘सोशल मिडीयावर येऊन ’ मी तुम्हाला मरु देणार नाही, कसं मरु देईल, ती माझी जबाबदारी आहे, आणि ती मी पाळणार, त्यासाठी कोणी काहीही बोललं तरी मी ऐकणार नाही’ असं बोलणं सोपं असतं, पण लोकांना निर्बंधात जगता यावं यासाठी काय करणार आहात?

Advertisement

Advertisement