Advertisement

अध्यात्माच्या गडासाठी  पणाला लागली राजकीय फडांची प्रतिष्ठा

प्रजापत्र | Wednesday, 07/04/2021
बातमी शेअर करा

 बीड : बीड जिल्ह्याच्या राजकारणावर आणि समाजमनावर देखील अध्यात्मिक गडांचा प्रभाव नेहमीच राहिलेला आहे. गडांचे राजकारण आणि गडांवरून होणारे राजकारण याचे किस्से बीड जिल्ह्याला नवीन नाहीत. म्हणूनच अध्यात्मिक गड आपल्या 'प्रभावाखाली ' राहावेत यासाठी राजकारणी झटत असतात . बीड शहरापासून जवळ असलेल्या राम गडावरील नवीन महंत नियुक्तीच्या माध्यमातून त्याचा पुन्हा प्रत्यय आला. अध्यात्माच्या या गडाची अनेक राजकीय फडांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर धांडे महाराजांच्या नियुक्तीनंतर त्यावर पडदा पडला आहे.

 

बीड शहरापासून जवळ असलेला रामगड. या गडाला ऐतिहासिक आख्यायिका आहे. श्रीराम वनवासात असताना त्यांचा काही काळ येथे रहिवास  असल्याचे सांगितले जाते .पंचक्रोशीतील  अनेक गावात गडाचा भक्त परिवार आहे. मात्र तरीही हा गड विकासापासून दूरच राहिलेला. या गडाचे महंत असलेल्या लक्ष्मण महाराजांचे मागील आठवड्यात निधन झाले .आणि गडाच्या मठाधिपतिपदी कोणाला नेमायचे यावरून पुढाऱ्यांचे 'राजकारण ' सुरु झाले. खरेतर लक्ष्मण महाराजांनी आपला उत्तराधिकारी निवडून ठेवला असता तर राजकीय आखाड्यांना रंग चढला नसता. पण महाराजांनी तसे न केल्याने यात राजकीय प्रवेशाला वाव मिळाला आणि तब्बल ४ दिवस या एका गडाभोवती राजकीय फड चांगलेच रंगले.

 

एका पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी थेट आपल्याच भागातील एका महाराजांची महंतपदी निवड जाहीर केली. मात्र जनभावना पाहून त्या महाराजांनीच इकडे यायला नकार दिला. तर दुसऱ्या एका राजकीय नेत्याच्या घरी वेगळी बैठक आणि रणनीती ठरली, मात्र जाहीरपणे भूमिका घेताना या नेत्यांच्या 'आपला महंत नेमण्याशी काहीच संबंध नसल्याची ' भूमिका घेतली. एक राजकीय व्यक्ती पुढाकार घेतोय हे कळताच अनेक राजकीय आखाडे यात सक्रिय झाले, तिसरकिडे ग्रामस्थांची भूमिका वेगळीच होती. अगदी नारायणगडाचे मठाधिपती शिवाजी महाराज यांच्याकडे 'लॉबिंग ' करण्यासाठी अनेक पुढारी गेले. अवघ्या तीन चार दिवसात एका गडाची ३-४ महाराजांची नावे चर्चेत आली. राजकारणातील धुरंधरांना या गडावर 'आपले ' महाराज हवे होते, आणि त्यासाठीच सारी प्रतिष्ठा पणाला लावली जात होती. अखेर नारायण गडाचे महंत असलेल्या शिवाजी महाराजांच्या 'भरवशावर ' आता अमोल धांडे गडाचे महंत झाले आहेत . मात्र त्यांना शुभेच्छा देतानाही काहींनी नाराजीचा सूर लावल्याने ते देखील 'मेटाकुटीला ' आले आहेत.
( गडाच्या महंत पदासाठी राजकारण्यांनी जोर लावण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी नारायणगड आणि भगवानगड देखील या राजकारणाचे साक्षीदार ठरल्याचा इतिहास आहे. )

 

Advertisement

Advertisement