Advertisement

दिलीप वळसे-पाटील यांनी हाती घेतली गृहमंत्री पदाची सूत्रे

प्रजापत्र | Tuesday, 06/04/2021
बातमी शेअर करा

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. अनिल देशमुखांनी काल म्हणजेच, 5 एप्रिलला आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर लगेचच राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे गृहमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. आज वळसे-पाटील यांनी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. 'सध्याची परिस्थिती अवघड आणि आव्हानात्मक आहे. पण, गृहमंत्रीपदाची जबाबदारी मी पार पाडण्याचे काम करेन', अशी प्रतिक्रिया दिलीप वळसे-पाटील यांनी यावेळी माध्यमांना दिली.

 

दिलीप वळसे-पाटील यांनी आज राज्याचे नवे गृहमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मी आजच पदभार स्वीकारला आहे. ही जबाबदारी पार पाडण्याचे काम मी करेन. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. स्वच्छ प्रशासन हा माझा प्रयत्न राहील, प्रशासनात माझा कुठला राजकीय हस्तक्षेप असणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

तसेच, सध्याचा काळ अवघड आणि चॅलेंजिंग आहे. कोरोनामुळे पोलिस फोर्स रस्त्यावर आहेत. पोलिस दलाचे काम कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आहे. या महिन्यात विविध धर्मीयांचे सण, उत्सव आहेत. त्यामुळे पोलिसांचे काम अजूनच वाढणार आहे, असे वळसे-पाटील म्हणाले.
 

Advertisement

Advertisement