मुंबई : लॉकडाऊन केलाच पाहिजे या मताचा मी नाही पण आजच्या तारखेला लॉकडाऊनशिवाय दुसरा कोणता पर्याय मला दिसत नाही. मी अनेकांशी बोलतोय, कडक निर्बंधावर भागेल का? याची चाचपणी सुरु आहे. पण गरज पडली तर लॉकडाऊन लावावाच लागेल. दोन दिवसात या बाबतचा निर्णय घेवू. मी लॉकडाऊन लावत नाही तर लॉकडाऊनचा इशारा देतोय या शब्दात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील लॉकडाऊनचा निर्णय पुन्हा अधांतरी ठेवला आहे. दोन दिवसांनंतर आता सरकार काय करते याकडे सर्वांचे लक्ष राहिल.
राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लॉकडाऊनच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी नागरिकांशी संवाद साधला. यात त्यांनी कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. रुग्णवाढ अशीच राहिली तर येत्या काही दिवसात सर्व रुग्णालयातील खाटा अपुर्या पडतील. आपण भौतिक सुविधा वाढवू, खाटा वाढवू, पण मनुष्यबळ कोठून आणणार असा सवाल केला.
लॉकडाऊन लावणे परवडणारे नाही हे माहित आहे, पण सामान्यांना मरु देणे देखील मला सहन होणार नाही त्यामुळे येत्या दोन दिवसात काही निर्बंध कठोर करुन भागेल का? या बाबत मी तज्ञांशी चर्चा करत आहे. लॉकडाऊन वगळता संसर्ग रोखण्याचा दुसरा कोणता उपाय आहे का या बाबत चाचपणी सुरु आहे. पुढच्या दोन दिवसात परिस्थिती आणखी कोणत्या वळणावर पोहचते हे मी पाहणार आहे. त्यानंतर मात्र दुसरा कोणताही पर्याय समोर आला नाही तर नाईलाजाने लॉकडाऊन लावावा लागेल. मी आज लॉकडाऊनचा इशारा देतोय असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊनचा निर्णय दोन दिवसांनंतर होणार आहे.
शहरातील गर्दी कमी व्हावी, वाहतूक व्यवस्थेतील गर्दी कमी व्हावी यासाठी काही कडक निर्बंध लावून परिस्थिती नियंत्रणात आणता येते का? याचाही विचार केला जाईल. मात्र आता जनतेनेही कोरोनाशी लढण्याची जिद्द ठेवली पाहिजे. लॉकडाऊन टाळण्यासाठी धैर्याने वागले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. कारण नसताना घराबाहेर पडू नका, गर्दी टाळा आणि मास्क लावा असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले. त्यांनी विरोधकांवरही टिका केली. लॉकडाऊनला विरोध करण्यासाठी नव्हे तर कोरोनात ज्यांचे बळी गेले त्या कुटुंबांना सावरण्यासाठी, कोरोनाला विरोध करण्यासाठी, उपचार करणार्या यंत्रणेला मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरा असा टोलाही त्यांनी लगावला.
प्रजापत्र | Friday, 02/04/2021
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा