पुणे- शहर व जिल्ह्यात झपाट्याने फोफावणारी करोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. पुढील सात दिवस पुणे जिल्ह्यात सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. उद्यापासून (शनिवार) या संचारबंदीची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.
पुण्यातील करोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी काय करता येईल, याबाबत विचार करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज महत्त्वाची बैठक झाली. पुणे विभागीय आयुक्त, पुण्याचे जिल्हाधिकारी, जिल्ह्यातील महापालिकांचे अधिकारी व लोकप्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. बैठकीत संपूर्ण लॉकडाऊनला विरोध करण्यात आला. त्याऐवजी कठोर निर्बंध लादण्यावर एकमत झाले. त्यानंतर पुढील सात दिवस सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लावण्याचा निर्णय घेण्यात आली. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली. सात दिवसांनंतर पुन्हा आढावा बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचं राव यांनी सांगितलं.
हॉटेल, रेस्टॉरंट, बार, मॉल आणि चित्रपटगृहे बंद राहणार. हॉटेलमधून पार्सल सेवा सुरू राहणार
उद्योग किंवा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी बसेसची स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या जाणार
संचारबंदीच्या काळात खासगी कार्यालयांमधून घरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना संबंधित कंपन्यांनी त्याबाबतचे पत्र दिले असेल तर त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही.
विवाह समारंभ ५० लोकांच्या उपस्थितीत, तर अंत्यविधी २० लोकांच्या उपस्थितीत होणार
उद्याने ही पूर्वीप्रमाणे सकाळी सुरू राहणार
राजकीय, सांस्कृतिक, सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी