Advertisement

कोव्हिड सेंटरमध्ये दारू आणि गांज्याची पार्टी

प्रजापत्र | Monday, 29/03/2021
बातमी शेअर करा

डोंबिवली : गेल्या महिन्यात कल्याणमधल्या कोव्हिड सेंटरमध्ये एका वार्डबॉयने महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली होती. आता पुन्हा डोंबिवलीमधील सावळाराम क्रीडा संकुलातील कोव्हिड सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांची  रुग्णालयात गांजा आणि दारू पार्टी करीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

 

 कल्याणमधल्या कोव्हिड सेंटरबाबत या आधीही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आता असेच संतापजनक कृत्य येथील रुग्णालय कर्मचाऱ्यांनी केले आहे. रुग्णालयात दारू आणि गांजा पार्टी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

 
 या संतापजनक कृत्याचा व्हिडिओ काढणाऱ्या तरुणालाही पार्टी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मारहान केली आहे. त्यामुळे पुन्हा कोरोना रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

 संबधित कोव्हिड सेंटर पालिका प्रशासनाने उभारले असले तरी,  हे रुग्णालय खासगी डॉक्टरांच्या संस्थेमार्फत चालवण्यात येते. संबधित रुग्णालयात कर्मचाऱ्यांनी केलेले कृत्य अत्यंत चूकीचे आहे.  असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

 

ठेकेदाराने पार्टी करणाऱ्या तिन्ही कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. या सारख्या घटना पुन्हा घडू नयेत. याची दक्षता घेण्याच्या सूचना संबधित ठेकेदाराला पालिकेच्या आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

Advertisement

Advertisement