Advertisement

डॉक्टरांवर कारवाईची तलवार असेल रुग्णांना उपचारच मिळणार नाहीत: धोरणात एकवाक्यता हवी

प्रजापत्र | Friday, 17/07/2020
बातमी शेअर करा

बीड : एकीकडे जिल्ह्यातिल सर्वजनिकआरोग्य सेवा कोरोनाच्या संसर्गाला रोखण्याच्या आणि उपचाराच्या कामाला लागलेली असतानाच सामान्य रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचार मिळणे देखील अवघड झाले आहे. आज उपचार केलेला रुग्ण उद्या कोरोना पॉझिटिव्ह निघाला तर दवाखाना बंद ठेवून स्वतः क्वारंटाईन व्हायला लागेल आणि नको त्या चौकशा आणि कागदपत्रांच्या खेळात अडकवा लागेल म्हणून अनेक खाजगी डॉक्टर सध्या रुग्ण न तपासणे पसंत करत आहेत. याचा परिणाम गंभीर रुग्णांना देखील वेळेत उपचार मिळायला तयार नाही. त्यामुळे रुग्णालयांच्या बाबतीत आयसीएमआरचे धोरण, आरोग्य संचालकांच्या सूचना आणि जिल्हा प्रशासनाची भूमिका यांच्यात एकवाक्यता असणे गरजेचे झाले आहे.
बीड जिल्ह्यात सरकारी आरोग्य यंत्रणा कोरोनावरील उपचारांमध्ये अडकलेली असतानाच कोरोनाव्यतिरिक्तच्या रुग्णांना खाजगी रुग्णालयांमधून उपचार घेण्यात देखील अडचणी येत आहेत. ह्रदयरोग किंवा इतर आजार असलेल्या रुग्णांना , किंवा ज्यांना उपचारासाठी दाखल करून घेणे गरजेचे आहे अशा रुग्णांना दाखल करून घेताना अगोदर कोविड चाचणी करून घेण्याचा आग्रह खाजगी डॉक्टर करू लागलेले आहेत. त्या तपासणीसाठी नमुने पाठविणे, त्याचा अहवाल येणे यात किमान ३ दिवसांचा कालावधी जात आहे, त्यामुळे या काळात सदर रुग्णाला कोणताही उपचार मिळत नसल्याचे चित्र आहे.
खाजगी डॉक्टरांनी एखाद्या रुग्णावर एखाद्या आजारासाठी  उपचार केले आणि त्यानंतर काही दिवसांनी सदर रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आला तर लगेच सदर रुग्णालय बंद करणे , रुग्णालयातील स्टाफ क्वारंटाईन करणे आणि इतर गोष्टी प्रशासनाकडून केल्या जात आहेत. तसेच अनेक प्रकरणात सदर डॉक्टरांना आरोपीसाखी वागणूक मिळत आहे. त्यामुळे असली वागणूक सहन करण्यापेक्षा रुग्ण तपासणी बंद ठेवलेली परवडली अशा मानसिकतेत जिल्ह्यातील वैद्यकीय व्यावसायिक आहेत. याचा फटका मात्र सामान्य रुग्णांना बसू लागलेला आहे. त्यामुळेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांसोबत नेमके कसे वागायचे आणि काय भूमिका घ्यायची याबाबत प्रशासन आणि आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचीच जागृती करणे आवश्यक आहे. यासंदर्भात आयसीएमआर, आरोग्य संचालक यांचे निर्देश आणि स्थानिक प्रशासनाची भूमिका यांची योग्य सांगड घालणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात सामान्यांना उपचार मिळणे अवघड होईल
-----
काय आहेत आरोग्य संचालकांच्या सूचना ?
एखाद्या खाजगी रुग्णालयात उपचार झालेल्या रुग्णाला कोरोनाची लागण झालेली असल्याचे समोर आले तर नेमके काय करावे यासाठी आरोग्य संचालकांनी आयसीएमआरच्या निर्देशांप्रमाणे सूचना दिल्या आहेत त्यात  नॉन कोविड रुग्णालयात कोरोनाचा रुग्ण आढळल्यास सदर रुग्ण लगेच कोविड रुग्णालयात पाठवावा, जर तेथील स्टाफ पीपीई किट वापरात असेल तर त्या स्टाफला क्वारंटाईन करू नये, जर स्टाफ पीपीई किट वापरात नसेल आणि रुग्णाच्या जवळच्या संपर्कात आला असेल आणि हाय रिस्क कॉन्टॅक्ट मध्ये मोडत असेल, ते केवळ अशा स्टाफला  १४ दिवस होम क्वारंटाईन करून त्यांची तपासणी करावी . लो रिस्क स्टाफला होम क्वारंटाईन करावे आणि त्यांच्यात लक्षणे दिसतात का हे पाहावे . सदर रुग्णालय व्यवस्थित निर्जंतुक केले जावे. फर्निचर, बेड शीट , इतर उपकरणे स्टर्लाईझ करावीत असे सांगतानाच अशा प्रकरणात संपूर्ण दवाखाना बंद करण्याची आवश्यकता नसून, रुग्णाचा संपर्क ज्या ज्या भागात आला आहे, तो भाग २४ तास बंद ठेवावा आणि इतर रुग्णांमुळे हे शक्य नसेल तर जेथे रुग्णाचा वर जास्त होता तितकाच भाग २४  तास बंद ठेवावा अशा सूचना दिलेल्या आहेत. कोविड रुग्णालय म्हणून ज्या रुग्णालयांना मान्यता मिळालेली आहे, त्यांना यातील अनेक तरतुदी शिथिल आहेत. मात्र असे असतानाही प्रत्येक ठिकाणी वेगळी भूमिका घेतली जात आहे, अनेकदा खाजगी डॉक्टरांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याची भूमिका घेतली जात आहे, किंवा संपूर्ण रुग्णालयाच  बंद केले जात आहे  त्यामुळे देखील खाजगी वैद्यकीय व्यावसायिक सध्या रुग्ण तपासणी टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत.

----
कोरोनासदृश रुग्णांची माहिती कळवा; जिल्हाधिकारी
दरम्यान बीड  शहरातील एका रुग्णालयात उपचार घेतलेल्या एका रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे आणि आता त्याच्या संपर्कातील स्टाफ आणि आणखी काही रुग्ण कोरोनाग्रस्त झाल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाने सर्व खाजगी डॉक्टरांना त्यांच्याकडे दाखल होणाऱ्या आयएलाय (इन्फ्लुएंझा लाईक इलनेस ) रुग्णांची माहिती, तसेच कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाची माहिती तात्काळ आरोग्य विभागास द्यावी अशा सूचना आणखी एकदा दिल्या आहेत. जी रुग्णालये याचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याचा  इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. 

 

Advertisement

Advertisement