बीड : मागील खरीप हंगामात बीड जिल्ह्यात काढणीच्यावेळी झालेल्या पावसात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते, मात्र पीक विमा कंपनीने मोजक्याच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली, यावर ज्यांनी पीक विमा भरला होता आणि ज्यांचे नाव सरकारी नुकसान भरपाईच्या यादीत आहे अशा शेतकऱ्यांना काढनिश्चत जोखीम या सदराखाली तात्काळ पीक विम्याची नुकसान भरपाई द्यावी असे निर्देश राज्याच्या कृषी आयुक्तांनी दिले आहेत.
पीक विमा योजनेत काढणी पूर्व आणि काढणी पश्चात झालेल्या नुकसानीचा समावेश करण्यात आलेला आहे. असे असतानाही , मागील खरीप हंगामात नेमका काढणीच्या वेळी पाऊस होऊन नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई देण्यात आली नव्हती. थेट पंचनामे न झाल्याचे सांगत विमा कंपनीने हजारो शेतकऱ्यांचे विमा नुकसान भरपाई दावे नाकारले होते.
या पार्श्वभूमीवर आता राज्याच्या कृषी आयुक्तांनी सरसकट नुकसानभरपाई देण्याचे निर्देश विमा कंपन्यांना दिले आहेत आणि याची आमलबजावणी होईल याची खातरजमा करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत.
कोणाला मिळणार लाभ
काढणी पूर्व आणि काढणी पश्चात जोखीम या बाबी खाली सदर नुकसान भरपाई देण्याचे निर्देश आहेत. यात महसूल विभागाने केलेले पंचनामे गृहीत धरावेत, यात ज्यांचे नुकसान ३३% पेक्षा जास्त आहे, आणि ज्यांना सरकारी अनुदान मिळाले आहे अशांची यादी घ्यावी आणि यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनाही पीक विमा भरला होता , त्यांना नुकसान भरपाई द्यावी असे निर्देश देण्यात आले आहेत.