Advertisement

नियोजन समितीसाठी शिवसैनिकांचे थेट मुख्यमंत्र्यांना साकडे

प्रजापत्र | Sunday, 07/03/2021
बातमी शेअर करा

बीड : महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील संबंध ताणले जात असल्याचे चित्र आहे. बीड जिल्हा नियोजन समितीवर आपल्याला स्थान मिळावे यासाठी शिवसैनिकांनी चक्क मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाच साकडे घातले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी स्वतःसह आणखी दोघांना जिल्हा नियोजन समितीवर घेण्यासाठी धनंजय मुंडे यांना सांगावे असे पत्रच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिले आहे.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली आणि अनेक ठिकाणी आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये समन्वय असला तरी बीड जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील संबंध ताणलेले असल्याचे चित्र आहे. जिथे शिवसेनेच्या बिया नगर पालिकेच्या तक्रारी राष्ट्रवादीचे  आमदार करीत असतात तेथे राष्ट्रवादीच्या ताब्यातील पंचायत समितीबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे तक्रारी करीत आले आहेत.

या पार्श्वभूमीवर आता जिल्हा नियोजन समितीवर स्वतःसह वैजिनाथ तांदळे आणि भीमराव वाघचौरे यांची वर्णी लागावी यासाठी कुंडलिक खांडे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पात्र लिहिले आहे. जिल्हा नियोजन समितीवरील निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या पालकमंत्र्यांच्या शिफारशीवरून केल्या जातात , त्यामुळे आता धनंजय मुंडे यांना आपल्यासह तिघांना नियोजन समितीवर घेण्याचे सांगावे असे पत्र खांडे यांना दिले असून मुख्यमंत्र्यांनी त्यावर हालचाली सुरु केल्या आहेत.

Advertisement

Advertisement