गेवराई,दि ६ ( वार्ताहार )जागा मालकाची खोटी स्वाक्षरी करुन बनावट कागदपत्राआधारे बोगस भाडेपत्र सादर करुन गेवराई येथील मोमिनपुरा भागातील हिना मेडिकल स्टोर्सचे परवानाधारक सय्यद अय्युब सय्यद इब्राहीम याने माझी व प्रशासनाची फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती .
तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्राच्या इतिहासात अशाप्रकारची कठोर कारवाई पहिल्यांदाच करण्यात आल्याने औषध विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.याप्रकरणाची हकीकत अशी सय्यद अब्दुल रहेमान सय्यद महेमूद यांच्या पत्नीच्या मालकीचे गेवराई शहरातील मोमिनपूरा भागात घर क्रमांक ४६५/२ आहे.याबाबत त्यांनी बीडच्या अन्न व औषध प्रशासनाला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,हिना मेडिकल स्टोर्सचे परवानाधारक सय्यद अय्युब सय्यद इब्राहीम याने सदर जागेबाबत नियमाचे उल्लंघन करुन खोटे व बनावटी भाडे करारनामा व खोटे कागदपत्र तयार करुन आपल्या कार्यालयात जमा केले व त्याआधारे औषध विक्रीचा परवाना हस्तगत केला तसेच शंभर रुपयाच्या बाँडवर व भाडे करारपत्रावर माझी खोटी सही करुन प्रशासनाची दिशाभूल तर माझी फसवणूक केली.
त्यामुळे या प्रकारणाची सखोल चौकशी करुन त्याचा मेडिकल परवाना रद्द करावा, अशी मागणी केली।या तक्रारीची बीडच्या अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त आर. बी. डोईफोडे यांनी गंभीर दखल घेऊन या प्रकरणाची कसून चौकशी केली.मेडिकलच्या तपासणीत अनेक त्रुटी आढळून आल्या,जागेच्या भाडेपत्रावरिल स्वाक्षरी ही मूळ जागा मालकाचीच आहे,याबाबत सय्यद अय्युब हा कोणताही पुरावा सादर करु न शकल्याने त्याच्या हिना मेडिकल स्टोअर्सचा औषध विक्रीचा परवाना दि.०१/०६/२०२१ पासून कायमस्वरुपी रद्द केला आहे।अन्न व औषध प्रशासनाच्या या कठोर कारवाईमुळे गेवराई तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.