बीड-कोरोनाबळींचे तातडीने डेथ ऑडिट करण्याच्या सूचना केंद्रीय समितीने आणि राज्याच्या आरोग्य सचिवांनी दिलेल्या असल्या तरी बीड जिल्ह्यात कोरोनाबळींच्या डेथ ऑडिटकडे आरोग्य विभागाचे लक्ष नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींपैकी 20 टक्क्याहून अधिक बळींचे डेथ ऑडिटच झाले नसल्याची माहिती आहे. एखाद्या रुग्णाचा कोरोनाने बळी गेल्यानंतर त्यामागची नेमकी कारणे काय होती हे शोधण्यासाठी डेथ ऑडिट महत्वाचे असते.
राज्यात कोरोनाबळींची संख्या वाढू लागल्यानंतर प्रत्येक बळीचे डेथ ऑडिट करावे अशा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र बीड जिल्ह्यात जिल्हा शल्यचिकित्सकांचे या डेथ ऑडिटकडे फारसे लक्ष नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात कोरोनाचे 580 हून अधिक बळी गेले आहेत. मात्र यातील 20 टक्के मृत्युचे डेथ ऑडिट अद्याप करण्यात आलेले नाही.
आरोग्य विभागातील त्रूटी उघड्या पडतील म्हणून
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार प्रत्येक प्रकरणाचे डेथ ऑडिट झाले तर त्या रुग्णाला वेळेवर उपचार मिळाले होते का? त्याच्या प्रकृतीत बिघाड होत असताना नेमके कोणते उपचार दिले गेले हे समोर येईल. मात्र हे करताना व्यवस्थेतील त्रूटी उघड्या पडतील त्यासाठी देखील डेथ ऑडिटला आरोग्य विभाग फारसा उत्सूक नसल्याचे सांगितले जाते.
कोविड वॉर्डात राऊंडच नाही
बीड जिल्हा रुग्णालय आणि अंबाजोगाईच्या स्वाराती ग्रामीण रुग्णालयात कोरोना बळींची संख्या वाढू लागली आहे. यामागे आरोग्य विभागातील डॉक्टरांचा निष्काळजीपणा देखील असल्याचे सुत्रांकडून समजते. बीडच्या जिल्हा रुग्णालयातील कोविड वॉर्डात जिल्हा शल्यचिकित्सकांचा दोन दोन महिने राऊंड होत नसल्याची माहिती आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार बीएएमएस डॉक्टरांवर हा वॉर्ड सोपविण्यात आला आहे. दुसरीकडे अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयाची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता किंवा मेडिसीन विभागाचे प्राध्यापक नियमित राऊंडच घेत नसल्याचे चित्र आहे.