गेवराई-तालुक्यातील गढी येथील जवाहर नवोदय विद्यालयातील शिक्षकांसह काही विद्यार्थी असे एकूण २० जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. या विद्यालयातील एका सहशिक्षकाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आल्यानंतर विद्यालय प्रशासनाने शाळेतील सर्व विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची अँटीजन तपासणी करून घेतली. त्यातून तब्बल १४ विद्यार्थी व काही शिक्षक कोरोनाबाधित झाल्याचे समोर आल्याची माहिती तहसीलदार सचिन खाडे यांनी दिली.
बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी आता कोरोनाचे हॉटस्पॉट होताना दिसत आहेत. राज्याच्या अनेक भागात निवासी शाळां आणि वस्तीगृहांमधून विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होत असल्याचे चित्र असतानाच आता गढी येथील नवोदय विद्यालयात देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी येथील विद्यार्थ्यांची अँटीजन तपासणी करण्यात आली, यात २० जण कोरोनाबाधित सापडल्याचे तहसीलदार सचिन खाडे यांनी सांगितले.
सदर विद्यालयाचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात येणार असून नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे, मास्कचा वापर करावा असे आवाहन खाडे यांनी केले आहे.
बातमी शेअर करा