Advertisement

बीड जिल्हा बँक निवडणुकीचा फियास्को  

प्रजापत्र | Wednesday, 24/02/2021
बातमी शेअर करा

राष्ट्रवादीने  केला  भाजपचा गेम, प्रशासक मंडळ नेमण्याची खेळी

बीड- जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बँकेवरील माजी मंत्री पंकजा मुंडेंच्या राजकीय वर्चस्वाला धक्का देण्याची जबरदस्त खेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून खेळण्यात आली आहे. बँकेच्या उपविधीप्रमाणे उमेदवार ज्या संस्थेशी संबंधित आहे त्या संस्थेला लेख परीक्षणाचा अ किंवा ब  दर्जा आवश्यक आहे. या नियमाला २०१५ च्या निवडणुकीत तत्कालीन सहकार मंत्र्यांनी स्थगिती दिली होती , त्यामुळे त्यावेळी काही अडचणी आल्या नाहीत. याहीवेळी त्या नियमाला स्थगिती मिळावी अशी याचिका भाऊसाहेब नाटकर यांनी सहकार मंत्र्यांकडे केली होती. सर्वांनाच मागील निवडणुकीप्रमाणे अशी स्थगिती मिळेल असेच अपेक्षित होते. या याचिकेवर सोमवारी सहकार मंत्र्यांसमोर सुनावणी होणार होती. मात्र सोमवारीच भाऊसाहेब नाटकर  यांनीच सदर याचिकाच मागे घेतल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे साहजिकच या नियमाला स्थगिती मिळू शकली नाही, आणि तब्बल ११ जागा रिक्त राहतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता ६ ते ८ जागांवर निवडणूक होईल, यात कोणीही निवडून आले तरी बहुसंख्य जागा रिक्त असल्याने संचालक मंडळ स्थापित करणे सहकार कायद्यानुसार शक्य होणार नाही आणि बँकेवर प्रशासकीय मंडळ स्थापन करण्याशिवाय सरकार समोर पर्याय राहणार नाही. बँकेच्या मतदारांची परिस्थिती पाहता  बँकेवर थेट वर्चस्व मिळविणे राष्ट्रवादीला शक्य नव्हते, मात्र आता प्रशासक मंडळाची वेळ आल्यास राष्ट्रवादी आणि सत्ताधारी बँकेवर आपले नियंत्रण मिळवू शकतात . राष्ट्रवादीने सहकारात भाजपला दिलेली ही  मोठी धोबी पछाड मानली जात आहे.

Advertisement

Advertisement