Advertisement

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठा पेच

प्रजापत्र | Tuesday, 23/02/2021
बातमी शेअर करा

बीड ; सेवा संस्था मतदारसंघातून जिल्हा बँकेची निवडणूक लढविण्यासाठी अ किंवा ब वर्गातीलच सेवा सांस्था आवश्यक असेल या नियमाला अद्याप पर्यंत स्थगिती न मिळाल्याने बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोठा पेच निर्माण  झाला आहे . सेवा संस्थांच्या ११ जागांसाठी आता पात्र उमेदवार मिळणे देखील अवघड होईल असे चित्र सध्या तरी आहे. सर्वांचे लक्ष आता छाननी कडे लागले आहे,
सेवा सोसायटी मतदार संघातून निवडणूक लढविणारा उमेदवार ज्या सेवा संस्थेचा प्रतिनिधी असेल ती सेवा संस्था लेखा परिक्षणातील अ किंवा ब वर्गातील असावी असे बँकेचे नियम सांगतात. मात्र बीड जिल्ह्यात 735 सेवा संस्थांपैकी हाताच्या  बोटावर मोजण्याइतक्या (अवघ्या 13) सेवा संस्था लेखा परिक्षणाच्या अ किंवा ब वर्गात आहेत. म्हणूनच जिल्हा बँकेच्या उपविधीतील या नियमाला स्थगिती द्यावी अशी याचिका सहकार मंत्र्यांसमोर करण्यात आली होती. मागील निवडणूकीच्यावेळी तत्कालीन सहकार मंत्र्यांनी या नियमाला स्थगिती दिली होती. आता ही तशी स्थगिती मिळावी यासाठी सहकार मंत्र्यांकडे याचिका करण्यात आली. यावर सहकार मंत्र्यांनी सोमवारी मुंबईत सुनावणी लावली होती. मात्र मंत्री अचानक सातार्‍याला गेले. त्यामुळे तातडीने सातार्‍याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 2 वाजता ही सुनावणी घेण्यात आली. सुनावणी नंतर मंत्र्यांनी स्थगितीचे तोंडी आदेशही दिल्याची माहिती आहे. तशी नोंद सुनावणीच्या रोजनाम्यावर करण्यात आली असून त्याचे आदेश काढण्यासाठी ही संचिका मुंबईला पाठविण्यात आली आहे. मात्र अद्यापपर्यंत मुंबईहून त्या संदर्भातचे आदेश आले नव्हते. त्यामुळे आता सेवासोसायटी मतदार संघातून निवडणूक लढवू इच्छीणार्‍या सर्वच उमेदवारांची धाकधूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. छाननीच्या वेळेपर्यंत सदर स्थगिती आदेश आले नाहीत तर सेवा संस्था मतदार संघातील अनेकांचे अर्ज बाद होऊ शकतात. तसेच सदर आदेश उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिनांकाच्या तारखेतीलच असणे आवश्यक आहे. त्यामुळे आता ११ जागांचे भवितव्य अंधारात आहे. 

 

 

Advertisement

Advertisement