बीड-वाळूच्या गाड्या सोडण्यासाठी लाच घेताना पकडण्यात आलेल्या उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांच्या संभाषणाची क्लिप समोर आल्यानंतर आता आणखी एक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी रात्री उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांना लाच घेताना पकडण्यात आले होते. मात्र त्यादिवशी शुक्रवारी सकाळी त्यांनी लाचेच्या सापळ्यात अडकलेल्या गटविकास अधिकारी नारायण मिसाळ यांचे सांत्वन केले होते. मित्राचे सांत्वन केल्यानंतर काही तासातच स्वत:च लाचेच्या सापळ्यात अडकण्याचा महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकार असावा.
माजलगावचे उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांना वाळू प्रकरणात लाच घेताना पकडण्यात आल्यानंतर अनेक किस्से समोर येऊ लागले आहेत. माजलगाव तालुक्यात आजही वाळुची तस्करी सर्रास सुरु असून याकडे दुर्लक्ष करावे म्हणून अनेक अधिकार्यांचे हप्ते 50 हजार ते 1 लाखाच्या घरात असल्याचे चर्चीले जाते. इतके करुनही आमच्या समोर आलेली वाहने चालणार नाहीत असा ‘साळसूद’पणा अधिकारी दाखवत असल्यानेच ही तक्रार झाल्याची माहिती आहे.
ज्या उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांच्याबद्दल तक्रार झाली त्यांच्याकडे काही काळ नरेगाच्या उपजिल्हाधिकारीपदाचा पदभार होता. याच काळात त्यांचे गटविकास अधिकारी नारायण मिसाळ यांच्याशी संबंध आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे गुरुवारीच लाचेच्या प्रकरणात गटविकास अधिकारी नारायण मिसाळ यांना पकडण्यात आले होते. सुत्रांच्या माहितीनूसार श्रीकांत गायकवाड यांनी शुक्रवारी सकाळी आपल्या या मित्राचे सांत्वनही केले आणि त्यानंतर त्याच दिवशी रात्री ते स्वत:च लाचेच्या सापळ्यात अडकले.