Advertisement

शिवभोजन योजनेत मोठा घोळ 

प्रजापत्र | Saturday, 20/02/2021
बातमी शेअर करा

बीड : गोरगरिबांना जेवणाची सोय व्हावी यासाठी सुरु केलेल्या शिवभोजन योजनेतून हॉटेलचालकच गब्बर होत असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात दिसत आहेत. शहरांमध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्या गरिबांना १० रूपात जेवण मिळावे यासाठी देखील ही योजना आहे, मात्र अनेक ठिकाणी या योजनेला चक्क खानावळीचा स्वरूप आले आहे. सरकारी कार्यालयाला सुट्टी असल्याच्या दिवशीही या कार्यालयासमोरील शिवभोजन थाळ्या हाऊसफुल्ल असल्याचे आकडे सांगत आहेत. त्यामुळे शिवभोजन नेमके कोण खाताहेत हे शोधण्याची गरज आहे.
राज्यभरात ठाकरे सरकारने शिवभोजन योजना सुरु केली. यात गरिबांना किमान दरात जेवण उपलब्ध व्हावे हा हेतू होता. यासाठी ज्या केंद्रांना शिवभोजन योजना मंजूर झाली, त्या केंद्रांना प्रत्येक थाळी मागे अनुदान दिले जाते. मात्र आता अनेक ठिकाणी कागदावरच शिवभोजन दिले जात असल्याचे चित्र आहे.
शिवभोजन केंद्रे ही प्रामुख्याने सरकारी कार्यालये, बसस्थानक परिसर, रुग्णालय परिसर आदी ठिकाणी सुरु करण्यात आली आहेत . तर काही ठिकाणी पूर्वीच सुरु असलेल्या हॉटेलमध्ये शिवभोजन सुरु करण्यात आले आहे. या प्रत्येक केंद्रात रोज जेवायला येणाऱ्या व्यक्तींची सरासरी संख्या सारखीच आहे. अगदी सुट्टीच्या दिवशीही तितकेच लोक येऊन शिवभोजनाचा आस्वाद घेत असल्याचे आकडे पाहून समोर येत आहे.
 
शनिवार ,रविवारी  देखील आकडे सारखेच
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किंवा जिल्हा परिषदे समोर शिवभोजन केंद्र मंजूर आहेत. या कार्यालयांना शनिवारी , रविवारी सुट्टी असते, त्यामुळे साहजिकच इतर दिवसांपेक्षा या दिवशी कमी गर्दी असते . त्यामुळे शनिवारी, रविवारी तरी शिवभोजनचे  लाभार्थी कमी होणे अपेक्षित आहे. मात्र सुट्टीच्या दिवशीही या केंद्रामधून इतर दिवसांसारखेच लोक जेवत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शिवभोजन ची खानावळ तर सुरु नाही ना ? असा प्रश्न निर्माण होत आहे.
 
सणाच्या दिवशीही टार्गेट पूर्ण
सुट्टीचे दिवस सोडा , अगदी सण  उत्सवाच्या दिवशीही या केंद्रांमधील आकडे मंजूर टाळ्यांच्या जवळपास पोचणारे असल्याचे दिसत आहे. १४ जानेवारीला मकरसंक्रांत होती, या दिवशी शक्यतो सारेच घरीच जेवतात , मात्र त्या दिवशी देखील जिल्ह्याचा आकडा १९४६ इतका होता. आणि जवळपास सर्वच केंद्रांचे टार्गेट पूर्ण झाले होते. त्यामुळे  सणावाराच्या दिवशीही शिवभोजन घेण्याची वेळ नेमकी कोणावर येत आहे हा देखील प्रश्न आहे.

Advertisement

Advertisement