Advertisement

 कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहिलेल्या दोन मंत्र्यांना कोरोनाची लागण

प्रजापत्र | Thursday, 18/02/2021
बातमी शेअर करा

मुंबई, 18 फेब्रुवारी : कोरोना  संकटावर मात केलेल्या महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढले आहे. राज्यातील दोन मोठ्या दिग्गज कॅबिनेट मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही कॅबिनेट मंत्री बुधवारी झालेल्या सह्याद्री येथील कॅबिनेट बैठकीत उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे या दोन कॅबिनेट मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यासंदर्भात ट्वीट करत माहिती दिली आहे की, कोरोनाची लागण आली असून तब्येत व्यवस्थित आहे. पुढील काही दिवस विलगीकरणात राहणार असून संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी खबरदारी घ्यावी. पुढील काही दिवस आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत सर्वसामान्यांचे प्रश्न आणि पक्षाचे काम करू, असंही पाटील यांनी म्हटलं आहे.

जयंत पाटील यांनी गेले पंधरा दिवस पूर्व विदर्भ उत्तर महाराष्ट्र येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा संवाद यात्रा सुरू केली होती. या माध्यमातून सुमारे पाच जिल्ह्यांमधील वेगवेगळ्या तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांशी संवाद कार्यकर्त्यांची बैठक करत होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी प्रदेश कॉंग्रेसच्या मुख्यालयात जयंत पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. त्यासाठी राज्यातील हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने आदेश कार्यालयामध्ये आले होते. त्याच दरम्यान जयंत पाटील यांना याची लागण झाल्याची चर्चा आहे.

दोन दिवसांपूर्वीच अचानक थोडासा ताप वाढल्याने जयंत पाटील यांनी कोरोनाची चाचणी करून घेतली. बुधवारी रात्री उशिरा जयंत पाटील यांची  कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे, तत्पूर्वी बुधवारी झालेल्या सह्याद्री येथील कॅबिनेट बैठकीत जयंत पाटील उपस्थित होते. त्यामुळे कॅबिनेटमधील इतर मंत्र्यांमध्.े देखील चिंतेचे वातावरण पसरले आहे.

दुसरीकडे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांना देखील कोरोनाची लागण झाली असून आज होणारा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयातील जनता दरबार त्यांनी रद्द केला असून खबरदारी म्हणून विलगीकरणात राहणार असल्याचे सांगितले आहे. कॅबिनेट बैठकीत दोन मंत्री पॉझिटिव्ह आढळल्याने इतर कॅबिनेट मंत्र्यांमध्ये सुद्धा भीतीचे वातावरण पसरले आहे.

Advertisement

Advertisement