Advertisement

धारुर तालुक्यात अवकाळीचा फटका

प्रजापत्र | Thursday, 18/02/2021
बातमी शेअर करा

किल्लेधारूर दि.१८ (प्रतिनिधी)- हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काल बीड जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिट झाली. धारुर तालुक्यातील देवठाणा, कांदेवाडी गावात गारपीटीने मोठे नुकसान झाले आहे. तर धारुर शहरासह तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. तालुक्यात तेलगाव येथे वीज कोसळण्याची घटना घडली आहे.

काल गोंदिया, यवतमाळ, अकोला जिल्ह्यात गारपिटीची नोंद झाली. आज कोकणात काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दि.१७ बुधवार रोजी रात्री दहा ते अकराच्या दरम्यान बीड जिल्ह्यातील धारुर तालुक्यात देवठाणा व कांदेवाडी गावात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. तेलगाव येथे भर चौकात वस्तीतील एका नारळाच्या झाडावर वीज कोसळली. देवठाणा शिवारात झालेल्या गारपीटीने टरबूज, खरबुज, हरभरा, ज्वारी, कांदा या पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनस्तरावर या नुकसानीचे पंचनामे करुन मदतीची मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.  

वेधशाळेचा इशारा

दि. १९ फेब्रुवारीला मात्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोरदार पावसाचा इशारा पुणे हवामान वेधशाळेकडून देण्यात आला आहे. १८ तारखेला मध्य-महाराष्ट्रातील खानदेश, नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज आहे आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता नाकारता येणार नाही. मात्र, १७ तारखेच्या तुलनेत विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीची तीव्रता तसेच क्षेत्र कमी होईल. १९ तारखेला काही प्रमाणात आभाळी हवामान राहील, परंतु हवामानात स्थिरता यायला सुरुवात होईल, आणि २० तारखेपासून राज्यात हवामान पूर्णपणे स्थिर होईल.

Advertisement

Advertisement