बीड दि.१७ - राज्यात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सरकार सतर्क झाले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनीही औरंगाबाद विभागातील अधिकाऱ्यांना सक्त सूचना केल्याच्या पार्श्वभूमीवर अंमलबजावणी सुरू झाली असून बीड जिल्ह्यात मंगल कार्यालय व कोचिंग क्लासेस ची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दिले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभासाठी केवळ पन्नास लोकांना कोरोनाचे सर्व नियम पाळून उपस्थित राहण्याची परवानगी दिलेली आहे. मात्र जिल्ह्यात मंगल कार्यालय व ग्रामीण भागात सर्व नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे निदर्शनास येत आहे.
तर कोचिंग क्लासेस मध्येही पन्नास टक्के मुलांना सर्व नियम पाळून उपस्थित राहण्याची परवानगी आहे. मात्र तिथेही नियमांची पायमल्ली होत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी पंचायत समितीचे बीडीओ, नगरपालिका, नगरपंचायत यांना सक्त सूचना दिल्या असून या दोन्हीही ठिकाणची तपासणी करण्यासाठी दोन अधिकाऱ्यांची नेमणूक करून निगराणी करण्याचे सूचित केले आहे. त्यामुळे लग्न समारंभ व कोचिंग क्लासेस मध्ये कोरोना विषयक नियमांचे उल्लंघन झाले तर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
प्रजापत्र | Wednesday, 17/02/2021
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा