राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण झाले पाहिजे असे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या काही आमदारांना वाटत असले आणि अजित पवार गटातील काहींना देखील याची उत्सुकता असली तरी विलीनीकरणाची वाट सोपी असणार नाही.शरद पवारांचा गट विलीनीकरणाच्या माध्यमातून एनडीएशी जोडला जाणार असेल तर भाजपला त्याचा केंद्रात फायदा होणार असला तरी यातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला काय मिळणार हा मोठा प्रश्न आहे.त्यामुळेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एनडीएमध्ये घ्यायला हरकत नाही,मात्र आमच्यात नको अशी भूमिका घेतली जातेय.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडत अजित पवारांनी भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन केली आणि त्यानंतर आपला गट म्हणजेच खरा राष्ट्रवादी असे निवडणूक आयोगाकडून शिक्कामोर्तब देखील करून घेतले,त्याला आता खूप काळ लोटला आहे.त्यानंतर राज्यातील राजकीय परिस्थितीचा अंदाज बांधून अजित पवारांनीच पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्याच्या चर्चा सुरु केल्या होत्या,हा देखील आता इतिहास झाला. 'अजित पवार असते तर' असे आता दोन्ही राष्ट्रवादीमधील काही नेत्यांकडून आपापल्या सोयीने बोलले जात असले तरी राजकारणात असल्या 'जर तर ' ला फार काही अर्थ नसतो.त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या ज्या चर्चा सुरु आहेत,त्याकडे केवळ भावनिकतेतून पाहता येणार नाही.
मुळात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची जास्त आवश्यकता आहे ती भाजपला आणि ती देखील केंद्रात.मोदी सरकारला कसेही करून मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करून घ्यायचे आहे आणि त्यासाठी त्यांना अधिकाधिक खासदार हवेत.आजघडीला शरद पवारांच्या गटाकडे हा आकडा मोठा आहेच,पण त्यासोबतच स्टॅलिन सारख्या मोठे खासदार घेऊन चालत असलेल्या नेत्याला 'समजुतीच्या ' चार गोष्टी सांगण्याचे काम शरद पवारांशिवाय कोणी करणार नाही याची देखील भाजपला जाणीव आहे.त्यामुळेच त्यांचा जास्त रस शरद पवारांमध्ये आहे.मात्र भाजपला शरद पवार गटाची कितीही आवश्यकता असली तरी ती अजित पवार गटाला,त्याहीपेक्षा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांना का वाटावी ? उद्या समजा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचं तर पक्षाचे नेतृत्व कोणाकडे जाईल ? शरद पवार पक्षात लक्ष्य घालत असतील तर सुनेत्रा पवार आणि त्यातही पार्थ पवारांची जागा कोणती असेल ? आजच अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये देखील पार्थ पवार सर्वांना पचत आणि पटत नाहीत,उद्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यावर तर परिस्थिती आणखीच बिकट होईल हे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांना चांगले माहित आहे,आणि म्हणूनच राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबद्दल ते दोघेही फारसे सकारात्मक नाहीत.
शरद पवारच्या राष्ट्रवादीबद्दल बोलायचे तर शरद पवार आता वयाच्या या टप्प्यावर थेट भाजपसोबत जातील अशी शक्यता तशी कमीच आहे. त्यांना सुप्रिया सुळेंसह आपल्या पक्षातील काही नेत्यांचे राजकीय भवितव्य सुरक्षित करायचे असले तरी त्यासाठी थेट भाजपसोबत जाण्याचे पाऊल ते उचलतील असे वाटत नाही.मग सत्तेसोबत जायचे नसेल तर अजित पवारांचा पक्ष आणि त्यांचे आमदार यासाठी तयार होतील का ? इकडे शरद पवारांच्या पक्षातील काही आमदार, खासदारांना सत्तेशिवाय करमत नसले तरी अनेक आमदारांच्या मतदारसंघातील सामाजिक परिस्थिती त्यांना थेट भाजपसोबत जायला पोषक नाही, मग अशा आमदारांचे काय करायचे ? रोहित पवारांसारख्या नेत्याला आज भाजप विरोधात आपले भवितव्य दिसत असताना ते विलीनीकरणाच्या माध्यमातून सत्तेसोबत जायला तयार कसे होतील ? अशा अनेक प्रश्नांचे चक्रव्यूह भेदल्याशिवाय विलीनीकरणाची वाट सापडणार नाहीच.
मुळात ज्यावेळी एकमेकांना प्रतिस्पर्धी मानणारे दोन पक्ष एकत्र येण्याची भाषा करतात,किंवा एकत्र येतात, त्यावेळी अनेकांची गोची होते, आणि त्यांना दुसरा मार्ग शोधावा लागतो. शरद पवारांनी राजीव गांधींच्या नेतृत्वात आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला त्यावेळी देखील शरद पवारांचे अनेक सहकारी त्यांना सोडून शिवसेनेत गेले होते,आता तशी पडझड होणार असेल तर दोन्ही राष्ट्रवादींना ते परवडणार आहे का ? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे जोपर्यंत मिळणार नाहीत, तोपर्यंत विलीनीकरण केवळ चर्चेतच असेल.

