बीड दि.१३ (प्रतिनिधी)-दिवाळीची गर्दी अजूनही असतानाच बीड शहरात खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी शहर म्हणजे आपली 'पाटीलकी' असल्यासारखे छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्त्यावरच गाड्या उभे करणे सुरु केले आहे.ट्रॅव्हल्सच्या या 'पाटीलकी'ने नागरिकांना मात्र वाहतूक कोंडीचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून वाहतुकीचे 'वैभव' च हरवल्याच्या चर्चा लोक करीत आहेत.
बीडमध्ये अलीकडच्या काळात रस्त्यांची सुरु असलेली कामे असतील किंवा नियोजनाचा अभाव यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐराणीवर येत आहे.सध्या सुभाष रोडवर सणासुदीमुळे मोठी गर्दी होत आहे.अण्णाभाऊ साठे चौकात वाहतुकीच्या नियोजनासाठी कर्मचारी कार्यरत आहेत.या कर्मचाऱ्यांकडून रिक्षा असतील किंवा इतर वाहनांना शिस्तीचे डोस दिले जातात.मात्र तिथूनच हाकेच्या अंतरावर असलेल्या खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांच्या भरत असलेल्या रस्त्यावरील या जत्रेकडे लक्ष्य द्यायला वाहतूक पोलिसांना वेळ नाही आश्चर्य.ऐन सणासुदीच्या काळात पुन्हा एकदा ट्रॅव्हल्सवाल्यांनी आपापल्या दुकानासमोर वाहने उभी करण्यास सुरुवात केल्याने ट्रॅव्हल्सवाल्यांच्या 'पाटीलकी' मुळे शहरातील 'वैभव' पुन्हा हरवले की काय असा प्रश्न सध्या अनेकांना पडत आहे.दरम्यान वाहतुक शाखेचे प्रभारी वैभव पाटील यांनी शहरात खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांना शहरात बंदी घातलेली होती आणि असे असतानाही पुन्हा एकदा खाजगी वाहने पोलिसांच्या नाकावर टिच्चून रात्री ७ वाजल्यापासूनच जर उभी रहात असतील तर यामागचे गौडबंगाल नेमके काय? असा देखील प्रश्न यानिमित्ताने उपस्थिती होत आहे.
अपघातांना निमंत्रण
छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या परिसरात रस्त्यावरच या गाड्या लावल्या जातात. त्यामुळे प्रवाशांना सोडण्यासाठी बहुतांशवेळा त्यांचे नातेवाईक थेट विरुद्ध दिशेने सुसाट वाहने चालवत येतात,त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत भर तर पडतेच,मात्र अपघातांचा धोका देखील वाढला आहे.एखाद्याला किरकोळ धक्का लागण्याचे प्रकार तर सर्रास घडतात,मात्र ही परिस्थिती भविष्यात एखाद्या मोठ्या अपघाताची नांदी ठरेलअसे चित्र आहे.

