मराठवाड्यात यंदाच्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मायक्रो फायनान्स आणि खासगी फायनान्स कंपन्यांच्या अमानुष वसुलीने शेतकऱ्यांचे जगणे असह्य केले आहे. नांदेड पाठोपाठ आता लातूर जिल्ह्यात कर्जवसुलीच्या जाचाला कंटाळून एका तरुण शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवली आहे.
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील अंकुलगा राणी येथील दत्तात्रय सूर्यकांत कुंभार या शेतकऱ्याने चार खासगी फायनान्स कंपन्यांकडून सुमारे ६ लाख २० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. दुष्काळामुळे कर्ज फेडणे शक्य न झाल्याने बँकांकडून त्यांचा मानसिक छळ सुरू होता. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत दत्तात्रय यांनी इक्विटास बँक, श्रीराम फायनान्स, रिंग ॲप आणि एचडीबी निलंगा या चार कंपन्यांच्या त्रासाचा उल्लेख केला आहे. सरकारने आपले कर्ज माफ करून उघड्यावर पडलेल्या कुटुंबाला (आई, पत्नी, दोन मुले) मदत करावी, अशी विनंती त्यांनी या चिठ्ठीत केली आहे.
काहीच दिवसांपूर्वी नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील चंद्रकांत शिंदे या शेतकऱ्याचा मृतदेह केएफ (खालसा) फायनान्सच्या कार्यालयात आढळला होता. केवळ १० हजार रुपयांच्या कर्जासाठी या शेतकऱ्याला दोन दिवस कार्यालयात डांबून मरेपर्यंत मारहाण केल्याचा गंभीर आरोप त्यांच्या आईने केला होता. रिझर्व्ह बँकेचे नियम धाब्यावर बसवून खासगी कंपन्यांकडून हा नंगानाच सुरू आहे.
पावसाने ७० दिवसांचा खंड दिल्याने खरीप पिके जळून खाक झाली आहेत. सध्या विभागातील २७८ गावे आणि ९१५ वाड्यांना ४८० टँकर्सने पाणीपुरवठा सुरू आहे. या अस्मानी संकटातच आर्थिक विवंचनेमुळे चालू वर्षात (जानेवारी ते सप्टेंबर) मराठवाड्यात तब्बल ७६० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक १७० घटना घडल्या असून, एकट्या सप्टेंबरमध्ये १०८ तर ऑक्टोबरमध्ये ५० हून अधिक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.

