धाराशिव : पदवीला प्रतिष्ठा, कौशल्याला संधी आणि तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. पाणी, रोजगार, शिक्षण, आरोग्य, शेती आणि उद्योगांच्या प्रश्नांची पुराव्यांसह मांडणी करून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणार आहे. मराठवाड्यातील पदवीधर मतदारांनी आपल्या प्रश्नांना सभागृहात मांडण्याची संधी द्यावी, असे आवाहन मराठवाडा शिक्षक संघाचे छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सुरेशराव घोटे यांनी केले.
मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने रविवार, ११ ऑक्टोबर रोजी धाराशिव येथे आयोजित मेळाव्यानिमित्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना घोटे म्हणाले की रोजगार, सरकारी भरती, स्पर्धा परीक्षा, उच्चशिक्षण, संशोधनातील रिक्त पदे, मराठवाड्याचा अनुशेष, दुष्काळ, शेती आणि सार्वजनिक आरोग्य या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण व महिला पदवीधर, अभियंते, वकील आणि नवउद्योजकांच्या संधींसाठीही काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव, जिल्हाध्यक्ष जयपाल शेरखाने, सरचिटणीस राजकुमार कदम, मुक्टो संघटनेचे कार्याध्यक्ष मारुती तेगमपुरे, बीड जिल्हाध्यक्ष कालिदास धपाटे, सचिव गणेश आजबे, भाऊसाहेब खिचडे, सुधीर दराडे, डी. के. भोसले, डी. एम. माळी, व्ही. जी. पवार, पी. एस. शिंदे आदी उपस्थित होते.

