बीड दि.15 (प्रतिनिधी)-कोणत्याही घटनेत कधी आरोपीची तर कधी तपासी अधिकार्याची जात पाहायची आणि त्यावरून पुन्हा एखाद्या समूहाला किंवा व्यक्तीला लक्ष्य करायचे असा पायंडाच बीड जिल्ह्यात पडला आहे. अमोल खुणे हल्ला प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर काही आंदोलक म्हणवणारांकडून तपास अधिकार्यांना टीकेचे लक्ष्य केले जात आहे.पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताना याची सर्व माहिती प्रभारींना असते.त्यांच्या आदेशानेच गुन्हा दाखल होतो.ग्रामीणचे प्रभारी सध्या सोमनाथ जाधव आहेत.तर गुन्हा दाखल करून घेतला तो देविदास सोनवळे यांनी.यानंतर या घटनेचा तपास गेला सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे यांच्याकडे.मात्र यातही काल काही आंदोलकांनी जात शोधून काढत ‘वड्याचे तेल वांग्यावर’ काढण्याचा प्रकार झाल्याने बीडमध्ये याच्या मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगल्या आहेत.
बीडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात अमोल खुणे यांना मारहाण केल्याची तक्रार देण्यात आली.पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यापूर्वी यात आरोपीचे म्हणणे आणि उपल्बध पुरावे बघून यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. तो दाखल करताना फिर्यादीने दिलेल्या घटनाक्रम आणि पुराव्यात तथ्य वाटल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास सोनवळे यांनी देखील गुन्हा दाखल करून घेतला.गुन्हा दाखल करून घेणार्या अधिकार्यांचे नाव म्हणून एफआयआरमध्ये सोनवळे यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख आहे.यानंतर पोलीस ठाण्याचे प्रभारी सोमनाथ जाधव यांनी सदरचा गुन्हा तपास करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे यांच्याकडे सोपविला. दराडे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून यातील तीन आरोपींना देखील ताब्यात घेतले.मात्र यानंतर काही जणांनी पोलीस अधिक्षक कार्यालय गाठून दराडेंवर आरोप करत खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा थेट कसा दाखल केला?दाखल करणारे दराडे हे एका जातीच्या विरोधात असल्याचे देखील आरोप केले.मात्र यात दाखल करणारे अधिकारी हे सोनवळे आहेत तर त्या ठाण्याचे प्रभारी हे जाधव आहेत,मग असे असताना देखील दराडेंवरच आरोप करण्यात आल्याने बीडमध्ये याच्या चर्चा मोठ्याप्रमाणावर चर्चा रंगल्या आहेत.

