Advertisement

६ नोव्हेंबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संपाचा इशारा!

प्रजापत्र | Thursday, 15/10/2026
बातमी शेअर करा

मुंबई : दिवाळीच्या सुट्टीत गावी जाण्याच्या तयारीत असलेल्या राज्यातील लाखो चाकरमान्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आणि चिंताजनक बातमी आहे. आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या ६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संप पुकारण्याचा थेट इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारला दिला आहे. त्यामुळे ऐन सणासुदीत महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या 'लालपरी'ची चाके थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे 'अल्टीमेटम'

एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी आपल्या आर्थिक आणि प्रशासकीय मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक सविस्तर निवेदन पाठवले आहे. शासनाने या मागण्यांवर तातडीने आणि सकारात्मक निर्णय न घेतल्यास ६ नोव्हेंबरपासून संपूर्ण राज्यात 'कामबंद आंदोलन' पुकारण्यात येईल, असा स्पष्ट इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.

 

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख ३ मागण्या:

वेळेवर पगार:प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चितपणे बँक खात्यात जमा झाले पाहिजे.

महागाई भत्ता (DA):राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर एसटी कर्मचाऱ्यांनाही ६० टक्के महागाई भत्ता लागू करण्यात यावा.

दिवाळी बोनस:ऐन सणासुदीत कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला १५ हजार रुपये दिवाळी बोनस जाहीर करावा.

 

गोपीचंद पडळकरांची मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर टीका

याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि एसटी महामंडळावर जोरदार निशाणा साधला आहे. "मंत्र्यांसोबत वारंवार बैठका होऊनही त्यात घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी का होत नाही?" असा खडा सवाल पडळकर यांनी विचारला. तसेच, "राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ज्या दिवशी महागाई भत्ता लागू होईल, त्याच दिवशी एसटी कर्मचाऱ्यांनाही तो लागू करण्याचे बैठकीत निश्चित झाले होते. मात्र, तीन महिने उलटूनही कर्मचाऱ्यांना हा भत्ता मिळालेला नाही," असा आरोप करत त्यांनी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दर्शवला आहे.

 

संप न टळल्यास मोठा गोंधळ

दिवाळीच्या काळात एसटी बसमध्ये प्रचंड गर्दी असते. जर एसटी कर्मचाऱ्यांनी हा संप खरोखर पुकारला, तर राज्यातील संपूर्ण प्रवासी वाहतूक व्यवस्था कोलमडून पडेल आणि सर्वसामान्यांचे अतोनात हाल होतील. आता राज्य सरकार आणि परिवहन विभाग या संपाची दखल घेऊन वेळीच तोडगा काढणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

Advertisement

Advertisement