Advertisement

केज: रस्ता नसल्याने सर्पदंश झालेल्या १२ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू

प्रजापत्र | Thursday, 15/10/2026
बातमी शेअर करा

केज : दळणवळणाच्या आणि पक्क्या रस्त्यांच्या अभावामुळे बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात किती भयंकर वास्तव आहे, याचा आणखी एक बळी केज तालुक्यातील गौरवाडी येथे गेला आहे. रस्ता नसल्याने रुग्णालयात वेळेवर पोहोचता न आल्यामुळे सर्पदंश झालेल्या १२ वर्षीय सुप्रिया बबरू घाडगे या शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. अवघ्या दोन वर्षांपूर्वी वडिलांचे छत्र हरपलेल्या या ऊसतोड कामगार कुटुंबावर आता लेक गमावल्याने मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

केज तालुक्यातील गौरवाडी वस्ती ही अतिशय दुर्गम आणि डोंगराळ भागात आहे. मंगळवारी सायंकाळी ६ वाजता शाळा सुटल्यानंतर सातवीत शिकणारी सुप्रिया घराबाहेर खेळत होती, तेव्हा तिला विषारी सापाने दंश केला. ही बाब लक्षात येताच तिच्या काकांनी आणि भावाने तिला वाचवण्यासाठी धावपळ सुरू केली.

 

रस्त्याअभावी उपचारांना उशीर

गौरवाडी वस्तीत पोहोचण्यासाठी आजतागायत पक्का रस्ता नाही, तिथे केवळ पाऊलवाट आहे. चारचाकी वाहन गावात येऊच शकत नसल्याने ग्रामस्थांनी १०८ रुग्णवाहिकेला फोनही केला नाही. अखेर नाईलाजाने सुप्रियाला दुचाकीवर बसवून नेकनूर येथील कुटीर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, कच्च्या रस्त्यावरून दुचाकीने प्रवास करताना खूप वेळ गेला. रात्री ८ वाजता रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉ. अशोक हुबेकर यांनी तिला तपासून मृत घोषित केले. वेळेत उपचार मिळाले असते तर सुप्रियाचे प्राण वाचले असते, अशी हळहळ व्यक्त होत आहे.

 

नियतीचा क्रूर खेळ

सुप्रियाचे वडील बबरू घाडगे यांचे दोन वर्षांपूर्वीच एका अपघातात निधन झाले आहे. तिच्या पश्चात आई, चार बहिणी आणि एक भाऊ असा परिवार आहे. तिची आई ऊसतोड कामगार असून, त्या आगामी हंगामासाठी साखर कारखान्यावर जाण्याच्या तयारीत होत्या. याच दरम्यान हा मोठा आघात झाल्याने संपूर्ण कुटुंब कोलमडून पडले आहे.

 

परंतु, योग्य रस्ता नसल्याने आणि उपचारांसाठी वेळेत पोहोचता न आल्याने एका निष्पाप मुलीला नाहक जीव गमवावा लागला आहे, ज्यामुळे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Advertisement

Advertisement